सावंतवाडी : एकीकडे सावंतवाडीचे कारागृह बंद करण्याच्या गोष्टी प्रशासनाकडून सुरू असताना त्या इमारतीवर पुन्हा लाखो रुपये खर्च करण्याचे कारण काय? तो वायफळ खर्च नेमका कोणाच्या घशात जाणार आहे? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे.
दरम्यान आंबोली बॉम्बस्फोटातील आरोपी ज्ञानेश्वर लोकरे पळून १० ते १२ वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र आता लाखो रुपये खर्च करुन प्रशासन काय साध्य करु इच्छीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत श्री. राऊळ यांनी प्रसिद्धपत्रक दिले आहे.
यात त्यांनी असे म्हटले आहे की, संस्थानकालीन कारागृहाची तटबंदीची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी लाखो रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे जिल्हा प्रशासन हे कारागृह बंद करायचे असून ओरोस येथील एकच कारागृह सुरू ठेवायचे आहे, असे सांगत आहे. असे असताना या कारागृहावर पुन्हा खर्च का? यामागे नेमके कोणाचे हात ओले केले जात आहेत? ठेकेदार मालामाल करण्यासाठी हा प्रकार नाही ना? असा सवाल त्यांनी केला असून अशा ठिकाणी खर्च करण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी पडणार्या विकासकामांवर खर्च केला जावा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सावंतवाडी शहरात तसेच तालुक्यात केवळ निधी खर्च करण्यासाठी कामे काढली जात असून निकृष्ठ दर्जाची कामे केली जात आहेत. ही वस्तूस्थिती आहे. याबाबत आम्ही आवाज उठविणार आहे, असे त्यांनी सांगितले.


