कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राज्य क्रीडा दिन खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता. त्यातील प्रत्येक क्रीडा प्रकारात यशस्वी खेळाडूंचा प्रमाणपत्र व शिल्ड देवून गौरव करण्यात आला. या समारंभाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. तवटे, सचिव श्री. वळंजू, विश्वस्त श्री. डेगवेकर आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अच्युत वणवे यांनी केले. क्रीडा दिनाचे महत्व आणि खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील स्थान या विषयी मार्गदर्शन करून शालेय क्रीडा स्पर्धेत कोणकोणत्या स्पर्धा घेतल्या?, याविषयी माहिती सांगून विजेत्या स्पर्धेकांचे कौतुक केले.

यावेळी उद्योजक अबिद नाईक, सौ. दिपा पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. वळंजू यांनी सर्व खेळाडू यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. तसेच नाथ पै एकांकीका स्पर्धेत प्रशालेतील बाल कलाकारांनी सादर केलेल्या शिमगो बाल नाट्याचा प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल लेखक मनोज मेस्री, दिग्दर्शक श्री. काणेकर व सर्व बाल कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दिविजा वृद्धाश्रमाने चित्रकला स्पर्धा घेतल्या होत्या, त्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव करण्यात आला.

जिल्हा विज्ञान स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. तवटे यांनी सर्वांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. अबिद नाईक यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे कोतुक करून शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी सर्वांचे स्वागत व कौतुक केले.
सूत्रसंचालन श्री. सिंगनाथ सरांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका वृषाली जाधव व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


