Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

चिंतन – शालेय शिक्षणात शिक्षकांनी करावे तरी काय.? – ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. ह. ना. जगताप यांचा विशेष लेख.

मित्रहो,

सर्वसाधारणपणे शिक्षणाने समाजाला दिशा द्यावी आणि विशेषतः शालेय शिक्षणाने उद्याचे जागरुक, देशप्रेमी व चारित्र्यावान नागरिक घडवावेत अशी अपेक्षा केली जाते. कारण शालेय वय हे अत्यंत संस्कारक्षम वय मानले जाते. अगदी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये देखील, उद्याचा नागरिक हा चिकित्सक, सर्जनशील व संविधानातील मूल्यांचा आदर बाळगणारा च नव्हे तर त्यांचा अंगिकार करणारा असावा असे अपेक्षिलेले आहे. आणि ही जबाबदारी शालेय शिक्षणावर टाकलेली आहे.
विद्यार्थी शाळेत किती वेळ खर्च करतात तर जास्तीत जास्त सहा तास ! इतर वेळा तो आपल्या पालकांसोबत व मित्रपरिवारा सोबत घालवीत असतात. शाळेत नेमून दिलेला अभ्यासक्रम व इतर उपक्रम शिक्षक त्यांच्या परीने पार पाडत असतात.
परंतु आई बाप कधी वाचन करीत नाहीत आणि मुलाला वाचनाचे महत्व सांगतात. कित्येक घरात तर पालकच
मद्यपान, किंवा इतर असामाजिक गोष्टी करतात व तेही ती बालके पहात असतात, आईवडील एकमेकां बद्दलच्या भावनांचा आदर करीत नाहीत, आपल्या आईवडिलांचा आदर करीत नाहीत आणि मुलांनी मात्र थोरामोठया लोकांच्या भावनांचा आदर करावा असे सांगतात, शाळेतील शिक्षकांची मुलांसमोर हेटाळणी करतात , अशा विसंगत बाबी विद्यार्थी शाळेचे ६ तास सोडले तर इतर वेळा पाहत असतो.
याशिवाय, सभोवती भ्रष्टाचार करून माणसे अगदी राजरोस प्रतिष्ठा मिळविताना पाहतो, वर्तमानपत्रातून वाचतो व टीव्हीतून पाहतो. अत्यंत असमाजिक कृत्ये करणाऱ्या व्यक्ती राजकीय नेते, मंत्री म्हणून मिरविताना पाहतो. असे सामाजिक वातावरण असताना शाळेतील शिक्षकांच्या माहिती अध्यापनातून वेळ काढून केलेल्या उपदेशाचा त्यांच्यावर कितपत परिणाम होईल ?
एका बाजूला चिकित्सक वृत्ती जोपासायला शाळेत सांगायचे व बाहेर मात्र अंधश्रध्देला खतपाणी घालणारे उपक्रम राबवायचे अशाने चिकित्सक वृत्ती कशी विकसित होईल ? संविधानातील मूल्यांचा आदर करायला सांगायचे व संविधानातील मूल्ये पायदळी तुडविणाऱ्या व्यक्ती राजरोसपणे सत्ता भोगताना पहायचे , प्रामाणिकपणाचे उपदेशाचे डोस द्यायचे आणि भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशातून उपभोग घेणाऱ्या श्रीमंतीचे गोडवे गायचे व त्यांचे अनुकरण करायचे , शहारातील नद्या, ओढे, नाले तुंबवून तेथे उंचच उंच इमारती
बांधायच्या आणी शाळेत पर्यावरणाचे महत्व पटवून द्यायचे, अशा सामाजिक वातावरणात शालेय शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी करावे तरी काय ?
या सर्व कोलाहलातून आपण फक्त आपला विषय इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, मराठी अशा विषयातील माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हेच आपले कार्य प्रामाणिकपणे करणे असे शिक्षक समजत असतील तर त्यांचे काय चुकते.?

       – डॉ. ह .ना. जगताप

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles