कणकवली : महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ व मुंबई विद्यापीठ महाविद्यालय व प्राध्यापक संघटनेच्या वतीने (बुक्टू) प्राध्यापकांच्या विविध न्याय मागण्यासाठी टप्प्याटप्प्याने रचनात्मक आंदोलन उभे केले आहे. या सर्व आंदोलनात अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि शासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव गट उभा करावा असे आवाहन मुंबई विद्यापीठ महाविद्यालय व प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. जी. बी राजे यांनी केले.
येथील एचपीसीएल सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राध्यापकांचा भव्य मेळावा पार पडला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जी. बी राजे यांनी सविस्तर भूमिका विषयक केली.
यावेळी मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम, मुंबई विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. विनोदसिंह पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. नानासाहेब कांबळे, कणकवली कॉलेज बुक्टू संघटना प्रमुख डॉ. शामराव दिसले उपस्थित होते.
“अलीकडील काळात कंत्राटी शिक्षक व तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. प्राध्यापकांची नियमित पदोन्नती, आर्थिक भ्रष्टाचाराचे वाढते पेव, उद्भबोधन व प्रशिक्षण वर्गासाठी मिळणारी मुदतवाढ, नवीन शैक्षणिक धोरणातील तफावत, पदवी व पदव्युतर स्तरावरील विविध प्रश्न अशा सर्वच बाबतीत शासन स्तरावरून चालढकल होत आहे. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची सुद्धा पायमल्ली होत आहे.
विशेषतः उच्च शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकारी जाणीवपूर्वक प्राध्यापकांच्या प्रश्नावर नकारात्मक वातावरण तयार करत असल्याचा आरोप डॉ. जी.बी. राजे यांनी केला.
मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांचे तसेच कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रश्न अधिसभेत प्राधान्याने मांडले जात आहेत. प्राध्यापकांनी एकनिष्ठपणे बुक्टू संघटनेत आघाडीवर राहून एकजूट ठेवावी. सातत्याने प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी बुक्टू संघटना बांधील असल्याचे सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम यांनी सांगितले.
खाजगीकरण व बाजारीकरण या बरोबरच नवीन शैक्षणिक धोरणाने ग्रामीण भागातील महाविद्यालये अडचणीत येणार आहेत याचे भान सर्वांनीच ठेवणे आवश्यक असून आपल्या अधिकाराबाबत अधिकाधिक सजग राहिले पाहिजे’ असे प्रतिपादन प्रा.विनोदसिंह पाटील यांनी या वेळी केले.
‘प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर संघटना रचनात्मक आणि संघर्षात्मक काम करते, त्यासाठी प्रत्येक प्राध्यापकांनीही संघटित राहून संघर्षशील राहिले पाहिजे’ असे मत या वेळी डॉ. नानासाहेब कांबळे यांनी मांडले.
मेळाव्याची पार्श्वभूमी व उद्देश डॉ. सोमनाथ कदम यांनी प्रास्ताविकातून कथन केले. सूत्रसंचालन प्रा.सचिन दर्पे यांनी व शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. शामराव डिसले यांनी मानले.
यावेळी जिल्ह्यातील एकूण ८२ प्राध्यापक उपस्थित होते.


