वाचक मित्रहो,
गेल्यावर्षी इंदौर , उज्जैन, भोपाळ अशा भटकंतीमध्ये आमच्या मित्रांच्या आग्रहाखातर उज्जैनच्या प्रसिद्ध अशा महांकाळेश्वर मंदिरास भेट दिली. ते बऱ्याच लोकांचे श्रध्दास्थान आहे.त्यामुळे तेथे नेहमीप्रमाणेच प्रचंड गर्दी होती. ती तशी असणार हेही मी गृहीत धरले होते. परंतु तेथे एका नवीनच देवस्थानाचा उदय झाला आहे . त्याचे नाव मंगळनाथ मंदिर आहे. हे एक सुंदर भव्य असे मंदिर आहे . चौकशी करता हे मंगळ ग्रहाचे मंदिर आहे असे समजले . आता अवकाशातील ग्रह हा देव कधी आणि कसा झाला हे लक्षात आले नाही . तेथे भव्य मंदिर बांधण्यासाठी SBI या बँकेने मदत केलेली आहे .ज्या बँकेचा NPA 20 टक्के च्या पुढे पोहोचलेला होता. ( कोणत्याही बँकेचा NPA 5% पेक्षा कमी असावा अशी अपेक्षा असते ) अशा बँकेने या कामासाठी सहकार्य करावे का ? बँकेचे हे काम आहे कां हा एक प्रश्नच आणि अशा मंदिराला भाविकांनी किती व कां गर्दी करावी हाही एक प्रश्न ?
येथेच एक वेधशाळा आहे . तेथे सुंदर असे प्लॅनेटोरियम असून तेथे वेगवेगळ्या वेळा कशा ठरतात ? अक्षांश , रेखांशा सहित माहिती देणाऱ्या घड्याळाची प्रतिकृती आहे . दुर्दैवाने येथे भेट देणा ऱ्यांची संख्या अत्यंत नगण्य होती. साधारणपणे अशीच परिस्थिती बहुतेक पर्यटन स्थळांची आहे. जेथे अत्यंत भव्य दिव्य वैज्ञानिक , औद्योगिक बाबी आहेत. तेथे सर्वसामान्य पर्यटक ढुंकूनही पहात नाहीत . तर याऊलट मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी ! बरे , मंदीरामध्ये गर्दीही समजू शकतो पण गल्ली बोळातील बाबा महाराजांचे मठ देखील दिवसेंदिवस पर्यटनस्थळे म्हणून विकसित होत आहेत. व त्याठिकाणी गर्दी वाढतच चाललेली आहे.
एका बाजूला विज्ञानाच्या साह्याने देश प्रचंड वेगाने प्रगती करीत असताना तितक्याच वेगाने धार्मिक अंधश्रद्धांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे शासनही अशा गोष्टींना प्रोत्साहन देत आहे. शासन एखाद्या गावाच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणार नाही, शाळेच्या इमारतीकडे लक्ष देणार नाही पण त्याच गावातील मंदिराचा जीर्णीद्वार करायला अनुदान देते. आणि हो , लोकांचीही तशीच मागणी असते. हे सगळे पाहिल्यावर असे वाटते आपण कोठे चाल लो आहोत ? एका बाजूला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात, विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृतीचा व शोधन वृत्तीचा विकास व्हायला पाहिजे, उद्याचा नागरिक वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बाळगणारा असावा, असे म्हणायचे व बरोबर याऊलट वर्तन शासनाचे व समाजाचे होताना दिसत आहे. ही विसंगती पाहिल्यावर म्हणावे वाटते..
खरचं मेरा भारत महान.!
डॉ..ह. ना. जगताप.
दि. २९ / १२/ २४


