Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

रेल्वेवर चोरांचा डल्ला.! ; वर्षभरात ३ लाख टॉवेल, १८ हजार बेडशीट चोरीला, दंड किती?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. अनेकदा लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाते. बहुतांश वेळा रेल्वेच्या एसी डब्ब्यात प्रवास करताना बेडशीट, टॉवेल, उशी दिली जाते. प्रवाशी या वस्तूंचा विनाशुल्क वापर करु शकतात आणि वापरानंतर या वस्तू तिथेच ठेवून तुम्ही तुमच्या स्टेशनला उतरु शकता. पण काही प्रवाशी रेल्वेच्या या सुविधेचा गैरवापर करतात. गेल्या काही दिवसापासून रेल्वेतील चादर, उशी आणि टॉवेल यांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रेल्वेला खूप मोठा फटका बसत आहे. आता याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने काही नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

छत्तीसगडच्या बिलासपूर झोनमध्ये सर्वाधिक चोरीच्या घटना

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवाशी हे लांबचा प्रवास करताना चादरी, उशी आणि बेडशीट हे सामान चोरी करतात. या सामानासोबतच आता चमचा, किटली, नळ तसेच बाथरुममधील वस्तू चोरुन नेण्याचे प्रमाणही वाढलं आहे. आतापर्यंत छत्तीसगडच्या बिलासपूर झोनच्या ट्रेनमध्ये सर्वाधिक सामान चोरीला गेल्याचे प्रकार समोर आले आहेत. यातील बिलासपूर आणि दुर्ग या मार्गावरुन चालणाऱ्या एक्सप्रेसमध्ये चादर, बेडशीट, उशांचे कव्हर, टॉवेल याची मोठ्या प्रमाणावर चोरी झाली आहे.

गेल्या वर्षभरात किती चादरी आणि टॉवेल चोरीला?

आतापर्यंतच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार, रेल्वेतून सर्वाधिक चादरी आणि टॉवेल चोरीला गेले आहेत. त्यामुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान होत आहे. 2023-24 या वर्षात रेल्वेमधून 18 हजार 208 बेडशीट आणि 2,796 ब्लँकेट चोरीला गेले आहेत. त्यासोतच 19,767 उशांचे कव्हर आणि 3,08,505 टॉवेल चोरीला गेले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

शिक्षा काय?

या घटनेनंतर आता रेल्वेने याबद्दल कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, रेल्वेत प्रवाशांना वापरण्यासाठी दिले जाणारे सर्व सामान ही रेल्वेची मालमत्ता आहे. यानुसार रेल्वे मालमत्ता कायदा 1966 अंतर्गत ट्रेनमधून मालमत्ता चोरीच्या विरोधात कारवाई करण्याची तरतूद आहे. जर अशा प्रकरणी कोणी चोरी करताना आढळलं तर या गुन्ह्यासाठी एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. तसेच एक हजार रुपयांचा दंडही होऊ शकतो. तसेच 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा वाढू शकते.

जेव्हा तुम्ही एसी कोचमधून प्रवास करता तेव्हा तुम्हाला दोन चादरी, एक ब्लँकेट, एक उशी, त्याचे कव्हर आणि एक टॉवेल असा संपूर्ण सेट दिला जातो. काही डब्ब्यात प्रवाशांना फक्त उशी आणि चादरी दिल्या जातात. अनेकदा प्रवासानंतर तुम्ही तुमच्या सीटवर चादर, उशी अशीच सोडून निघता आणि तुम्ही निघाल्यानंतर तुमच्या सीटवरुन कोणी त्या वस्तू चोरल्या तरीही तुमच्यावर कारवाई होऊ शकते. यामुळेच प्रवासानंतर तुम्ही अटेंडंटला या वस्तू परत आणून द्याव्यात, जेणेकरुन यामुळे तुम्हाला विनाकारण भुर्दंड बसणार नाही.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles