वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा ग्रामपंचायतकडून नळ योजनेद्वारे अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असताना सध्या 2 ते 4 दिवसातून एकदा लाभार्थी कुटुंबांना पाणी पुरवठा होत आहे. पाण्याच्या लाईनचे पाईप वारंवार फुटत असल्याने दुरुस्ती साठी 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी जात असतो. त्यामुळे आधीच हैराण झालेल्या लाभार्थी ना आता गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नळ योजना ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. या गढूळ पाण्यासोबत चीखलातील मासे वाहून येत असून पाण्याला प्रचंड दुर्गंध येत आहे. काही ठिकाणी मेलेले मासे अडकून पाईप लाईन बंद झालेली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी यासाठी खूप मेहनत घेत असले तरी शिरोडा ग्रामपंचायतकडून यावर योग्य ती कार्यवाही होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यमानाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेले प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.

या संदर्भात वेळोवेळी लेखी तक्रारी करून तसेच प्रत्येक वेळी ग्रामसभेत प्रश्न मांडले जात असतात. अशावेळी पाणी पुरवठा या पुढे योग्य प्रकारे सुरू करून देण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासना कडून दिले जाते. प्रत्यक्षात होती ती परिस्थिती बरी होती अशी म्हणण्याची पाळी ग्रामस्थांवर येत आहे, अशी प्रतिक्रिया माजी सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली आहे.
नळ योजनेद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी आणि घरगुती वापरा साठीच करावा, असे आवाहन एकीकडे ग्रामपंचायत करत असताना दुसरीकडे मात्र गुरेढोरे धुण्याच्या लायकीचे ही पाणी पुरवठा करत नसल्याचे दिसत आहे. तिलारी पाणी योजना मंजूर असून ही योजना लवकरात लवकर सुरू करण्याबाबतही ग्रामपंचायत गंभीर दिसत नसल्याने ग्रामस्थांनी करावे तरी काय?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ADVT –



