मुंबई : जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्हाला घेणे देणे नाही. तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. यावेळी आम्ही कष्ट घेतले होते. मेहनत केली होती. लोकसभेत आम्हाला केवळ एक जागा मिळाले. मागेही एका लोकसभा निवडणुकीत माझ्या मुलास निवडून आणता आली नाही. या लोकसभेत पत्नीला निवडून आणता आले नाही. त्यावेळी आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांनी सुनावले. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक निकालाबाबत संशय व्यक्त केला होता. त्यावर अजित पवार यांनी या शब्दांत त्यांना आरसा दाखवला.
लाडकी बहीण पैसे परत घेणार नाही –
लाडकी बहीण योजना आम्ही आणली आणि जाहीर केली. या योजनेचा लाभ २ लाख ५० हजार उत्पन्न असणाऱ्यांना द्यायचा होता. त्याचा लाभ अपात्र लोकांनी घेतला असला तरी त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाही. ज्यांना पैसे दिले त्यांच्याकडून परत घेण्यात येणार नाही. महिलांना कुठल्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
राहुल सोलापूरकर यांच्यावर पोलीस कारवाई करणार –
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर जनतेतून मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त होत आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल असे विधान करायला नको होते. पोलीस त्याची चौकशी करून कारवाई करतील. राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी आता चौकशीसाठी स्वतःची टीम लावावी. शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. यामुळे त्यांचे रडगाणे सुरु आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
ADVT –



