मुंबई : आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे यांचा आज (9 फेब्रुवारी) 61 वा वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील शुभ-दीप निवासस्थानी विशेष सेलिब्रेशन करत हा वाढदिवस साजरा केला आहे. पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचं औक्षण केलं आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर कुटूंबियांच्यासोबत शिंदेंनी केक कापून वाढदिवस साजरा केला.यावेळी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू, एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश आणि कुटूंबातील सर्व सदस्य सोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. शिंदेंना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून शिंदेंशी बातचीत केली आहे. “कुठे आहात? काय चाललं आहे?” अशी देखील विचारणा पंतप्रधानांनी केली आहे. त्याचबरोबर शुभेच्छा देखील मराठीतून दिल्याची माहिती आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असल्याची एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली. एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये 5 ते 7 मिनिटे फोन वर चर्चा सुरू होती. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात आरोग्य सेवा बळकट आणि वेगवान व्हावी या उद्देशाने मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. राज्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून कर्करोग दिन निदान व उपचारासाठी आणि राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे.
आशा भोसलेंकडून शिंदेंसाठी खास शुभेच्छा संदेश
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्ही मला फार आवडता. तुम्ही अचानक वरती आलात, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही काम करत होतात. तुम्ही अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशी तुम्ही पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली, त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे. कारण, त्यावेळेला सगळं काही निवळलं होतं, त्यावेळी तुम्ही आलात. ज्या हिंमतीने तुम्ही आलात, लोकांच्या बोलण्याला तु्म्ही तोंड दिलं, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळी तुम्ही परिस्थितीला तोंड दिलं आणि यशस्वी झालात आणि आणखी यशस्वी व्हाल, असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. शतायुषी व्हा..! आणि असंच कार्य करत राहा. चांगलं कार्य केल्याने कुणीही कधीही संपत नाही.”
ADVT –





