Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

प्रेम म्हणजे..? – डाॅ. रुपेश पाटकर यांचा विशेष लेख.

🌹प्रेम म्हणजे…..!🌹
कुमारवयीन मुलांचे वय हे ‘आयडेंटिटी व्हर्सेस कन्फ्युजन’ या द्व॔द्वाचे वय असल्याचे मानसशास्त्रज्ञ एरिक एरिकसन म्हणतो. या वयात व्यक्ती ‘मी कोण?’ याचा शोध घेत असते. आपल्या क्षमता कोणत्या? आपल्या मर्यादा कोणत्या? आपल्या आवडीनिवडी कोणत्या याचा शोध घेत असते. हा शोध कुमारांनी जाणीवपूर्वक घ्यावा, असे सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. माझी व्याख्यान देण्याची पद्धत थोडी खेळीमेळीची असते. प्रश्न विचारून, विनोद करून मी मुलांना विचार करायला प्रवृत्त करतो.
गेल्या आठवडय़ात मी एका शाळेत बोलत होतो. मी मुलांना म्हटले, ‘तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात तुम्ही एक शोध घेत असता. कोणता शोध ते तुम्ही सांगाल का?’ मी हा प्रश्न विचारात वर्गाच्या उजव्या बाजूला बघत होतो. त्यावर डाव्या बाजूच्या मुलांच्यातून काॅमेंट आली, ‘मुलींचा!’ त्यावर अख्खा वर्ग हसायला लागला. माझे खेळीमेळीत बोलण्याचे टेक्निक माझ्याच अंगलट आले होते. दुसरे झाले होते असे की माझ्यासमोर साठ मुले बसवण्यात आली होती. शिवाय मुलांना खुलेपणाने बोलता यावे म्हणून मी त्यांच्या शिक्षकांना वर्गात थांबवले नव्हते. त्यामुळे एका बाजूला मुले जास्त, त्यात नेहमी वचक ठेवणारे शिक्षक नाहीत आणि मी त्यांच्याशी खेळीमेळीने बोलत होतो. एक क्षण मला वाटले की अख्खे लेक्चर आता वाया जाणार! काय करावे?


मी त्या कमेंटवरच बोलू लागलो. मी म्हटले, ‘हो. बरोबर आहे. या वयात तुम्ही मुलींचा शोध घेता. पण का घेता? काय आहे या मागची भावना?’ त्या मुलाला माझा हा प्रश्न अनपेक्षित होता. त्यालाच काय, वर्गातील सगळ्याच मुलांना हा प्रश्न अनपेक्षित होता. त्याचवेळी आणखी एक काॅमेंट आली, ‘शुक्रवारी व्हॅलेंटाईन!’
‘हो. बरोबर. पण व्हॅलेंटाईन का साजरा करतात रे?’ मी विचारले.
‘त्या दिवशी मुलीला प्रपोज करतात आणि गिफ्ट देतात!’ मागून आणखी एकाचा आवाज आला आणि अख्खा वर्ग पुन्हा मोठ्याने हसला.
त्यांचे हसणे थांबल्यावर मी म्हणालो, ‘पण तुम्ही तर अजून त्या वयात आलेले दिसत नाही. मी विचारले काय आणि तुम्ही सांगता काय? तुम्ही तर चारपाच वर्षांच्या शेंबड्या मुलासारखे बोलायला लागलात. व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देतात, प्रपोज करतात, हे पहिली दुसरीतील मुलेदेखील सांगतील. पण मुळात व्हॅलेंटाईन डे साजरा का करतात?’ माझ्या या प्रश्नाचे काही मुलांना कुतूहल वाटले. काॅमेंट करणाऱ्या मुलांना ‘ऐका रे जरा’ असे ती चिडून म्हणाली.
मी म्हणालो, ‘हा खरे तर हौतात्म्याचा दिवस आहे!’ मी हौतात्म्य असा शब्द वापरताच मुले गंभीर होऊन ऐकू लागली.
‘ही तिसऱ्या शतकातील रोममधील गोष्ट. दुसरा क्लाॅडीयस त्यावेळेस रोमचा शासक होता. या राजाच्या असे लक्षात आले की आपले सैनिक चिवटपणे लढत नाहीयेत. पण त्या राजाला तर राज्य विस्ताराची लालसा होती. लोकांच्या देशावर हल्ले करणे, त्यांना लुटणे याची त्याला हाव होती. त्याने आपल्या दरबारातील विद्वानांचा सल्ला घेतला. विद्वान म्हणाले, ‘लग्न झालेले सैनिक चिवटपणे लढत नाहीत. ते आपल्या घरादाराचा, बायकोमुलांचा विचार करतात. त्यामुळे ते झोकून द्यायला घाबरतात.’ राजाने यावर विचार केला. त्याने ठरविले की आपण सैनिकांना लग्न करायलाच देऊ नये म्हणजे ते मरणाला न घाबरता लढतील. कोणत्याही देशातील तरूण मंडळी हीच तर सैनिक असतात. म्हणून ‘तरुणांनी लग्न करु नये’ असा राजाने हुकूम काढला. हा हुकूम मोडणाऱ्याला त्याने मृत्यूदंडाची शिक्षा करण्याची तरतूद ठेवली.
या क्लाॅडीयस राजाच्या राज्यात व्हॅलेंटाईन नावाचा एक पुरोहित होता. त्याला ही आज्ञा अन्याय्य वाटली. लोकांच्या प्रेमाच्या अधिकारावर, लोकांच्या लग्न करण्याच्या अधिकारावर हे आक्रमण वाटले. तो आपल्या परीने या हुकूमाच्या विरोधात गेला. त्याने लोकांची गुपचूप लग्ने लावणे सुरू केले. यात धोका होता. पण त्याने हा धोका पत्करला. व्हॅलेंटाईन राजाच्या हुकूमाविरोधात गुपचूप लग्ने लावतो, याची कुणकुण राजाच्या शिपायांना लागली. त्यांनी त्याच्यावर छापा टाकला. त्यावेळेस तो एका जोडप्याचे लग्न लावत होता. ते जोडपे सुखरूप पळून जाऊ शकले, पण व्हॅलेंटाईन मात्र पकडला गेला. त्याला राजाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्याचा शिरच्छेद करण्यापूर्वी त्याचा छळ करण्यात आला. पण तो वाकला नाही. त्याने राजाकडे दयेची भीक मागितली नाही. शेवटी १४ फेब्रुवारी या दिवशी त्याचे मुंडके उडवून त्याला ठार करण्यात आले. प्रेमी युगलांच्या लग्नाच्या अधिकारासाठी व्हॅलेंटाईन शहीद झाला. पण व्हॅलेंटाईनच्या शहादतीचा दिवस कसा साजरा केला जातो? उच्छृंखलपणे! बेजाबदारपणे!’
मी गोष्ट संपवली. मुले गंभीर झाली होती. मी पुढे म्हणालो, ‘मित्रांनो, तुम्ही ज्या वयात आहात, त्या वयात भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित करणारी भावना जाणवते. त्या भावनेला ‘प्रेम’ असा चुकीचा शब्द वापरला जातो. हे प्रेम नव्हे, लव्ह नव्हे. इंग्रजीत या भावनेला ‘इंफॅच्युएशन’ असा शब्द आहे. ही भावना काय असते हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण ही भावना अनेकांच्या बाबतीत जीवनमरणाचा प्रश्न बनते. लक्षात घ्या की हे केवळ शारीरिक किंवा लैंगिक आकर्षण नसते. अचानक एखादी व्यक्ती आवडू लागते. तीव्रपणे आवडू लागते. तिचा एखादा गुण मनात भरतो. उदाहरणार्थ बाह्यसौंदर्य. तिच्या संबंधीचे विचार मनाचा ताबा घेतात. तिला भेटावे. तिच्याशी काहीही करुन संवाद साधावा असे सारखे वाटत राहते. पण यात प्राॅब्लेम केव्हा सुरू होतो? त्या व्यक्तीने होकारात्मक प्रतिसाद दिला नाही किंवा दोघांचे काही काळ अफेअर चालले आणि मग एकाच्या मनातील ती भावना निघून गेली, की जिच्या डोक्यात तशी भावना उरते तिला फार त्रास होतो. जीव नकोसा होतो. अशावेळेस त्या व्यक्तीने या निराशेतून बाहेर पडण्यासाठी स्वतःला वेळ देणे आवश्यक असते. माझा क्लिनीकल एक्स्पिरियन्स सांगतो की असा त्रास जास्तीत जास्त सहा महीनेपर्यंत होतो. सहा महिने स्वतःला सांभाळले पाहीजे. या काळात फार त्रास होतो. कोणताही तर्क उपयोगी पडत नाही. पण अशा काळात स्वतःच्या मनाला पुन्हा पुन्हा हे बजवायला हवे की कोणतीही भावना मनात कायम रहात नाही. राग असो, निराशा असो, चिंता असो, या भावना कायम एकाच तीव्रतेने रहात नाहीत. वेळ जातो तसतशी तीव्रता कमी होत जाते. आपला भावनांबाबतचा नेहमीचा अनुभव असाच नाही का? काही भावना जलद दूर होतात तर काहींना दूर व्हायला थोडा जास्त वेळ लागतो, एवढाच काय तो फरक. इन्फॅच्युएशन तुटल्यानंतरच्या काळात जवळच्या नातेवाईकांनी, मित्रांनी त्याला विनाअट सांभाळले पाहीजे. इन्फॅच्युएट होणे ही चुक नाही. हे अनैसर्गिकही नाही. पण इन्फॅच्युएशनला प्रेम समजून बसणे मात्र चूक आहे. त्याला उदात्त काही समजून त्यात वाहून जाणे चूक आहे.
‘प्रेम म्हणजे नक्की काय हे तुम्ही आधी समजून घेतले पाहीजे. आपण आपल्या आईवडीलांवर प्रेम आहे असे म्हणतो. आईवडीलांवरील प्रेम आणि प्रियकर-प्रेयसीतील आकर्षण यात फरक आहे. एका उदाहरणाने हे समजून घेऊ. मी मघापासून तुमच्याशी बोलतोय. या सर्व वेळात तुम्हाला तुमच्या आईची आठवण कितीवेळा आली? बहुधा अजिबात आली नसेल. पण आपण अशी कल्पना करु की आता तुमच्या घरुन कोणी असा निरोप घेऊन आले की तुमच्या आईला बरे नाहीए, तिला डाॅक्टरकडे घेऊन चाललेत. तर….? हे ऐकताच तुमच्या काळजात ‘धस्स’ होईल! हे प्रेम! आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीच्या कल्याणाचा, त्या व्यक्तीच्या भल्याचा त्यात विचार असतो. पण इन्फॅच्युएशनमध्ये ती व्यक्ती माझी व्हावी, ती सतत सहवासात असावी, संपर्कात असावी अशी भावना असते. त्या भावनेखाली त्या व्यक्तीला खूश करण्यासाठी आपण वाटेल त्या गोष्टी करतो. आपल्याला वाटते की आपण त्या गोष्टी त्या व्यक्तीसाठी करतोय, पण त्या गोष्टी ती व्यक्ती आपल्यावर खूश रहावी ही सुप्त भावना असते.
आजच्या जगात प्रेम आणि आवड यातील फरक समजण्याची अधिकच गरज निर्माण झाली आहे. कारण दुसरी व्यक्ती आपल्या नकळत सहजच आपल्या मनात ही भावना निर्माण करण्याची शक्यता आहे. मोबाईल/ इंटरनेट सारख्या माध्यमांमुळे हे अधिक वाढले आहे. दुसर्‍याला इन्फॅच्युएट करुन फसवण्याचा घटना वाढत आहेत. अशा वेळेस भावनिकदृष्ट्या बुद्धिमान होण्याची गरज आहे.
इन्फॅच्युएशनचे वैशिष्ट्य असे की ते फार काळ टिकत नाही. ती कितीही तीव्र असले तरी ते टिकत नाही. त्याच्या तीव्रतेमुळे ती भावना कायम राहील असा भ्रम मात्र मनात असतो. हे कसे होते हे एका उदाहरणाने समजून घेऊ. तुम्ही लहान असताना जत्रेला गेला असाल. तेव्हा एखादे खेळणे तुम्हाला खूप आवडले असेल. पण त्याची किंमत जास्त असल्याने तुमच्या आईबाबांनी ते विकत घ्यायचे टाळण्याचा प्रयत्न केला असेल. तेव्हा तुमच्या मनाची स्थिती काय होती? तुम्ही काय म्हणाला होता? हे खेळणे मिळाले की पुन्हा कधीच दुसरे खेळणे मागणार नाही. सर्व सुख त्याच एका खेळण्यात एकवटल्यासारखे वाटले असेल ना? आणि समजा ते खेळणे तुमच्या आईवडीलांनी तुम्हाला घेऊन दिल्यावर तुमच्या त्या खेळण्याविषयीच्या भावनांचे काय झाले? एकदोन दिवस तुम्हाला ते खेळणे प्राणप्रिय होते. त्यानंतर हळूहळू त्यातील तुमचा इंटरेस्ट निघून गेला. इन्फॅच्युएशनचे असेच होते. म्हणून आपण ‘प्रेम’ करायला शिकले पाहीजे, प्रेमात पडायला नव्हे.’
मी हे मुलांना सांगितले खरे, पण प्रेम करणे ही कला आहे. त्या कलेवर एरिक फ्रॉम या मानसशास्त्रज्ञाने ‘आर्ट ऑफ लव्हिंग’ नावाचे सुंदर पुस्तक १९५६ मध्ये लिहिले आहे. जमले तर ते वाचून पहा!

                                                                         – डाॅ. रुपेश पाटकर. 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles