सावंतवाडी : ”या सावकारी कर्ज वसूल करणाऱ्या कंपनीचे करायचे काय, खाली डोके वरती पाय!”, “नाव लावता श्रीरामाचे, कार्य मात्र रावणाचे!”, “निषेध असो, निषेध असो, अशा फायनान्स कंपनीचा निषेध असो..!”, अशा जोरदार घोषणाबाजी करत एका फायनान्स कंपनीच्या विरोधात सावंतवाडी येथील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. अनेक गरजू व गोरगरीब लोकांकडून कर्जाच्या नावावर फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या पैशांची अवाजवी मागणी करून नाहक कर्जाच्या नावाखाली अशा साध्या भोळ्या जनतेची फसवणूक केली जात असेल तर त्या फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करू, असा इशारा येथे झालेल्या आंदोलनात लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी दिला. सावंतवाडी येथील एका फायनान्स कंपनीने ११ लाखाचे कर्ज देऊन तब्बल ६९ लाखाची वसुली करणाऱ्या कंपनीच्या विरोधात लोकाधिकार समितीने येथील गांधी चौकातील कंपनीच्या कार्यालयाखाली धरणे आंदोलन केले. जोपर्यंत कंपनीकडून आम्हाला लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

नेमळे येथील शामसुंदर मालवणकर नामक व्यक्तीने सन २०१३ मध्ये ११ लाखाचे कर्ज घेऊन सेकंड हँड ट्रक खरेदी केला होता. तसेच कर्ज प्रक्रिया करून ट्रक ताब्यात दिला. मात्र मूळ मालकाची एनओसी दिली नसल्यामुळे पुढील प्रक्रिया अर्धवट राहिली. त्यामुळे संबंधित कंपनीने तो ट्रक जप्त केला होता. मात्र त्या कर्जापोटी ६९ लाख रुपये वसूल करण्याची नोटीस मालवणकर यांना संबंधित फायनान्स कंपनीने बजावली होती. आपली फसवणूक झाली, असा आरोप करत मालवणकर यांनी याबाबत लोकाधिकार समितीकडे तक्रार केली. त्यानुसार लोकाधिकार समितीच्या वतीने आज येथील गांधी चौक परिसरातील कंपनीच्या कार्यालयाखाली आंदोलन करण्याचा इशारा देण्यात देण्यात आला होता. त्यानुसार आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी फायनान्स कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या फायनान्स कंपनीच्या अधिकारी तोंडी बोलून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत आम्हाला लेखी उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी त्याठिकाणी आलेल्या अधिकाऱ्याने लवकरात लवकर प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी माघार घेतली.

दरम्यान यावेळी मालवण येथे कार्यरत कार्यरत असलेल्या एका वसूली अधिकाऱ्याने कर्ज थकल्या प्रकरणात गाडी ओढणार नाही. यासाठी १० हजार रुपये आपल्या पत्नीचे नावे घेतल्याचा आरोप उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला तसेच पुरावे अधिकाऱ्यांकडून देण्यात आले व संबंधित तर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच हे दोन्ही प्रश्न लवकरात लवकर सोडण्यात यावे अन्यथा आम्ही कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर, कार्याध्यक्ष योगेश वाघमारे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नंदकुमार लोकरे, जिल्हा संघटक राजेश माने, जिल्हा उपसंघटक संजय पवार, जिल्हा सचिव डॉ. योगिता राणे, जिल्हा उपाध्यक्ष समीर आचरेकर, सचिव कमलेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विवेक नाईक, महिला संघटक कोमल केरकर, महासचिव सादिक डोंगरकर, अण्णा खवले उपजिल्हा संघटक महिला वैष्णवी गोवेकर, पूजा आचरेकर, नेहा परब, रश्मी दाभोलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष महेश साळगावकर, राजेश साळगावकर, राजू कासकर, प्रदीप फाळके, आबा मोर्ये आदि सहभागी झाले होते.
ADVT –




