छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्याने तीन महिलांनी एका तरूणीला उद्यानातच बदडलं. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्या पार्कमध्ये आजूबाजूला मुलं खेळत होती, तरीही त्या बायकांनी त्या तरूणीला धरून मारलं, तिचे केस ओढले आणि शिवीगाळही केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र याप्रकरणी, सिडको पोलिस ठाण्यात सोमवारी संध्याकाळपर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एन-११ मधील सार्वजनिक उद्यानात दुपारी ही घटना घडली. अंदाजे 25 वर्षांची तरुणी रविवारी एन-११ च्या सुदर्शननगरमधील एका उद्यानात बसलेली होती. तेवढ्यात तीन महिला तिचा पाठलाग करत तिथे आल्या आणि त्यांनी तिला त्या पार्कमध्येच गाठलं. आजूबाजूला एवढी लोकं होती, लहान मुलंही खेळत होती तरी त्या महिलांनी अचानक तिच्यावर हल्ला चढवला. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हल्ल्यामुळे घाबरलेली तरूणी त्यांना मारहाण न करण्यासाठी विनवण्या करत होती. मात्र, तीनही संतप्त महिलांनी तिचे केस खेचले, तसेच तिला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली, तिला लाथाबुक्क्यांनी अक्षरश: तुडवलं. माझ्या भावाचा नाद सोड, अशी धमकी देत शिवीगाळ केली.
मारहाण करणाऱ्यांमध्ये तरुणाची आई, काकू असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. शिवाय मुलीपायी मुलाने आईलाच सुनावल्याने हा वाद टोकाला गेल्याचे समजतं. त्यातून तीन महिलांनी मिळून मुलीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला तरी सिडको पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळपर्यंत या घटनेप्रकरणी कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.


