सावंतवाडी : शालेय शिक्षण विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आदर्श शाळा योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात केंद्रशाळा आजगावला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी या स्पर्धा संपूर्ण राज्यात एकाच वेळी घेण्यात आलेल्या होत्या.

आज माजगाव शाळा नंबर एक येथे एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रभारी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार वितरित करण्यात आले. आजगाव शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण हळदणकर, केंद्र मुख्याध्यापिका ममता जाधव, दिपाली केदार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र ,असा हा पुरस्कार आहे.
या यशाबद्दल आजगाव केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


