मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस क्षय रोगाचा (टीबी) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मागील १०० दिवसांत तब्बल ४० हजार नवीन टीबी रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यभर राबवण्यात आलेल्या तपासणी मोहिमेमध्ये १.३७ कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. ज्यातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
वाढती रुग्णसंख्या चिंताजनक –
टीबी हा संसर्गजन्य आजार असून तो नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. जागतिक स्तरावर टीबीचे सर्वाधिक रुग्ण भारतात असून, जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी २५ टक्के भारतात आहेत. विशेष म्हणजे, देशातील एकूण रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण हे फक्त महाराष्ट्रातील आहेत. ही आकडेवारी अत्यंत गंभीर असून आरोग्य क्षेत्राला मोठे आव्हान देणारी आहे.


