सावंतवाडी : तालुक्यातील सांगेली येथील इयत्ता अकरावी मध्ये शिकणार्या विद्यार्थ्याने आपल्याच घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सायंकाळी घडली. निशांत धोंडीबा नार्वेकर (वय १८, रा. सांगेली-खालचीवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याने नेमकी आत्महत्या का केली? याबाबत कारण कळू शकले नाही. याबाबतची खबर प्रदीप पोतदार यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार सावंतवाडी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मयत निशांत याचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामासाठी गेले होते. ते सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घरी परतले. त्यांना घराच्या वाश्याला नायलॉनच्या दुरीच्या साह्याने निशांत हा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, हवालदार संतोष गलोले, मनोज राऊत यांनी भेट दिली व पंचनामा केला. त्यावर सावंतवाडी येथील पोलीस स्थानकात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मात्र निशांत याने का आत्महत्या केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.


