मुंबई : ज्येष्ठ चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. सलीम अख्तर हे ८० आणि ९० च्या दशकातील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सलीम अख्तर यांनी अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती केली होती. यात ‘राजा की आयेगी बारात’, ‘कयामत’, ‘लोहा’, ‘बटवारा’, ‘फूल और अंगारे’, ‘बाजी’, ‘इज्जत’ आणि ‘बादल’ यांचा समावेश होता. सलीम अख्तर यांना साध्या आणि सरळ स्वभावासाठी ओळखले जायचे. ते एक यशस्वी निर्माते होते. त्यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात ‘आफताब पिक्चर्स’ या त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती केली.
राणी मुखर्जी, तमन्ना भाटिया सिनेसृष्टीत ब्रेक –
१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला ब्रेक दिला होता. ज्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. यासोबत अभिनेत्री तमन्ना भाटियाला ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून लाँच केले होते. त्यानंतरच ती सिनेसृष्टीत प्रसिद्धीझोतात आली.
हिंदी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा
सलीम अख्तर हे चित्रपट निर्माते म्हणून सक्रीय होते. सलीम अख्तर यांनी आफताब पिक्चर्स या बॅनरखाली ‘बटवारा’, ‘लोहा’, ‘कयामत’, ‘बाजी’, ‘इज्जत’, ‘फूल और अंगार’, ‘आदमी’, ‘बादल’ आणि ‘दूध का कर्ज’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी शमा अख्तर यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या, बुधवार ०९ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.


