मुंबई : राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये सर्वकाही आलेबल असल्याची चर्चा आहे. मात्र सत्ता स्थापन झाल्यापासून अनेक मुद्द्यांवरून महायुतीतील घटकपक्षांतील मतभेद समोर आलेले आहेत. पालकमंत्रिपदावरून तर महायुतीमध्या चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. दरम्यान, अर्थखात्याकडून आमच्या फाईली रोखून धरल्या जातात, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचे आमदार आणि मंत्री करतात असा दावा केला जातो. आता हाच वाद केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दरबारी पोहोचल्याचे म्हटले जात आहे.
अर्थखात्यासंदर्भात नेमकी काय तक्रार केली?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान, त्यांनी रायगडमध्ये असताना भाषणही केले. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भोजनही केले. मात्र त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शाहा यांच्यासोबतच्या बैठकीत महाराष्ट्राच्या अर्थखात्याबाबत तक्रार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमच्या फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, अशी तक्रारही शिंदेंनी शाहांकडे केल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
पुण्यात रात्री झाली होती भेट –
शिंदेंच्या मंत्र्यांच्या फाईली अर्थखात्याकडून लवकर मंजूर होत नसल्याचा वाद अर्थखात्याकडे पोहोचला आहे. आमदार आणि आमच्या मंत्र्यांची फाईल्स लवकर मंजूर होत नाहीत, अशी तक्रार शिंदे यांनी शहांकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. अमित शाहा आणि एकनाथ शिंदे यांची काल (11 एप्रिल) पुण्यात भेट झाली. याच भेटीत यासंदर्भात चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.
पालकमंत्रिपदावर मार्ग काढण्याचेही साकडे –
सोबतच अर्थखात्याकडून शिवसेनेच्या फाईल्स वेळेवर मंजूर झाल्या पाहिजे, यासाठी शिंदे यांनी शाहांकडे आग्रह धरल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. सोबतच या बैठकीत रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद सोडवावा, अशीही मागणी शिंदे यांनी शहा यांच्याकडे केल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.
वादावार सुटणार का? –
दरम्यान, आता राज्यातील फाईल्सच्या मंजुरीचा आणि पालकमंत्रिपदाचा विषय थेट अमित शहांकडे गेल्यामुळे हे दोन्ही विषय मार्गी लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


