विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, घटनातज्ज्ञ बाबासाहेब, पर्यावरण तज्ज्ञ बाबासाहेब, परिवर्तनाचा महामेरू बाबासाहेब,
सोशिक क्रांतिकारक बाबासाहेब,
सुरक्षेचा प्रहरी बाबासाहेब, महिलांचे कैवारी बाबासाहेब, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा महानायक बाबासाहेब,
मन्वंतर घडविणारा पत्रकार बाबासाहेब,
परिवर्तनाचा अग्रदूत बाबासाहेब,
अर्थ क्रांतिकारक बाबासाहेब,
कायदा तज्ज्ञ बाबासाहेब,
अशी एक ना विविध विशेषणे लावलीत तरी कमी पडतील, इतके प्रचंड कार्य विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे आहे.

बाबासाहेब हे लोकोत्तर पुरुष होते. त्यांनी समाजातील उपेक्षितांसाठी केलेले कार्य लेखणीत सामावणारे नाही.
एकविसाव्या शतकातील सर्वोच्च बुद्धीसम्राट, प्रकांड पंडित असे व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब.
अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व हे वाखाणण्याजोगे होते. समाजकारण, अर्थकारण, राजकारण, कृषी, कामगार, धर्म, संस्कृती अशा अनेक विषयांवरील त्यांचा व्यासंग दांडगा होता.
बाबासाहेबांनी आपल्या अंगी असलेल्या प्रज्ञाने केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील विद्वानांना प्रभावित केले. त्यांचे विचार हे काळाच्या पुढे होते. सामाजिक समतेवर आधारित समाज व्यवस्थेची निर्मिती व्हावी, यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले.
वंचितांना न्याय आणि सन्मान मिळावा, उपेक्षितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले.
मनुष्याला घडविण्यात आणि सक्षम करण्यात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठी त्यांनी ‘शिका संघटित व्हा, आणि संघर्ष करा..!’ ही शिकवण दिली. या प्रेरणेची शक्ती घेऊन आज कोट्यवधी समाजबांधव शिक्षण घेऊन सक्षम आणि समर्थ होत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला सर्वोत्तम देणगी दिली ती म्हणजे आपली राज्यघटना. त्यांना यथार्थरीत्या घटनेचे शिल्पकार संबोधले जाते. अत्यंत सखोल अभ्यास आणि अखंड परिश्रम घेऊन बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली. आज घटनेच्या मजबूत पायावर अतिशय प्रगल्भ अशी लोकशाही भारतात स्थापित झाली आहे. या लोकशाहीची पाळेमुळे देशाच्या भूमीत खोलवर रुजली. घटनेने सर्वांना समान न्याय, अधिकार, हक्क, प्रगती आणि विकासाच्या संधी दिल्या. ही सगळी किमया बाबासाहेबांची आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.
परिवर्तनाचे महामेरू –
केवळ घटनेचे शिल्पकार एवढीच बाबासाहेबांची ओळख नाही तर देशाच्या परिवर्तनाचे ते महामेरू ठरतात. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथातून मांडलेले सिद्धांत हे विषमते विरोधातील तत्त्वज्ञानाने प्रभावित आहेत. समतेवर निष्ठा असलेला, प्रचंड अभ्यास असलेला आणि परिवर्तनाचा महामेरू असलेला लढवय्या योद्धा म्हणून बाबासाहेब मला विशेष भावतात. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेतून आणि इतर ग्रंथातून अस्पृश्यता, मानव मुक्ती, धर्मांतर, लोकशाही यासंबंधी त्यांनी केलेली मांडणी आणि त्यातून देशात निर्माण होऊ घातलेल्या नवसमान निर्मितीची प्रक्रिया आपल्याला समजून घ्यावी लागेल. बाबासाहेबांची मानव मुक्ती संकल्पना संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी ठरते.
२१ व्या शतकात भेदाभेदाच्या विरोधात लढणाऱ्या आशियातील व युरोपातील बाधित लोकांना बाबासाहेब आणि त्यांचे विचार व कार्य एक प्रेरणास्त्रोत आहे. भारतीय समाजावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कार्याचा प्रभाव दिवसागणिक वाढताना दिसतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना नागरिकांच्या मदतीला आले ते फक्त संविधान आणि संविधानाने दिलेला मूलभूत व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्योत्तर काळात आंबेडकर अनुयायांपलीकडच्या भारतीयांनी घेतलेले संदर्भ, त्यांच्या हक्कासाठी बाबासाहेब आणि त्यांनी मांडलेले व्यक्ती स्वातंत्र्यसंबंधीचे विचार याचा त्यांना आधार वाटला. तत्कालीन आणीबाणी विरोधात लढणाऱ्या व्यक्तीला बाबासाहेब जवळचे वाटले. नंतरच्या पिढीसाठी आपल्या हक्कासाठी झगडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संविधान आणि डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या जगण्याचे आधार बनले. आज संविधानामुळे देशात परिवर्तनाची लाट निर्माण झाली. ही किमया बाबासाहेबांच्या दूरदृष्टीकोनाची आहे, हे मानावेच लागेल.
समता, स्वातंत्र्य, बंधूभाव व न्याय या मूलभूत तत्त्वांची नैतिक व कायदेशीर नाते संविधानामुळे बांधले गेले. संविधानाच्या उद्दिष्टांमध्ये ही तत्वे समाविष्ट करून त्याचा जागर आज होतो आहे. समताधिष्ठित समाज रचनेचे बाबासाहेब यांचे स्वप्न ही पहिली पायरी म्हणून राजकीय लोकशाहीतून व्यक्त झाले. सामाजिक आर्थिक लोकशाहीकडे वाटचाल करण्याचा प्रारंभ म्हणून या राजकीय व्यवस्थेकडे बघितले गेले. आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक धोरणाची वाटचाल सुरू झाली. सामाजिक लोकशाही, समता प्रस्थापित करण्यासाठी प्रबोधन व त्याला आधार असणारी घटना कारणीभूत ठरली. सन १९९३ मध्ये बाजारावर आधारित आर्थिक धोरणातून त्याला एक प्रकारची बाधा आणली गेली. तरी त्यातून आर्थिक क्षमतेसाठी करावयाच्या तरतुदीसाठी जनता कार्यरत राहिलेली दिसते. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी बाबासाहेब यांनी दोन पद्धतींचे अवलंबन केले. एक लोक लढे उभे करून मानव हा समान आहे आणि त्याच्या दर्जा देखील समान असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यातून चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, पुण्याचा पर्वती सत्याग्रह, अमरावतीचा अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह यांसारखे सत्याग्रह करून जनतेमध्ये ‘चर्चेचे मोहोळ’ उठविले.
प्रश्न सोडविण्यासाठी हीच एकमेव योग्य पद्धती मानली जाते. बाबासाहेबांनी १९५२ पर्यंतच्या हिंदू कोड बिल पर्यंत ही पद्धत विकसित केल. त्याचा परिणाम म्हणून रूढ अर्थाने विचार करण्यावर बंदी असलेला समाज अस्पृश्यांचा प्रश्नावर, महिलांच्या प्रश्नावर विचार करू लागला. प्रश्न न विचारणे व ग्रंथ धर्म प्रमाण स्वीकार व अंतिम सत्य त्यातच आहे, या बंदिस्त मानसिकतेत अडकलेल्या भारतीय समाजाला बाबासाहेबांनी मोकळे केले. आणि म्हणूनच बाबासाहेबांना ‘परिवर्तनाचा महामेरू’ हे विशेषण सार्थ ठरते.

चतुरस्त्र व अनंत उपकार असलेले बाबासाहेब-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविधांगी प्रचंड कार्यामुळे जगातील लोक त्यांना बोधिसत्व, घटनाकार, कायदे पंडित, इतिहासकार, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, राजकीय, मुत्सद्दी अभ्यासू पत्रकार, महान समाज सुधारक, उत्कृष्ट संसदपटू अशा चतुरस्त्र भूमिकांतून पाहतात.
उच्च शिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान आजही भारतीयांसह विदेशी लोकांना सुद्धा प्रेरणादायी आहे. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात आपल्यातील परखड व बुद्धिवादी वक्तृत्वामुळे त्यांनी अनेकदा ब्रिटिशांनादेखील हादरून सोडले होते.
“मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय आहे..!” असे सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथल्या जाचक अन्यायाविरुद्ध लढताना वैतागून म्हणतात – “मला मातृभूमीच नाही..!”
खरंतर असे म्हणण्यास त्यांना भाग पाडणारी येथील प्रस्थापित व्यवस्था म्हणजे भारताला लागलेली जातीयतेची कीड आहे, असेच म्हणावे लागेल.
सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या बाबासाहेबांनी इथल्या समाज रचनेत अमुलाग्र बदल घडवून आणला.
भारतावर सर्वार्थाने अनंत उपकार बाबासाहेबांचे आहेत. त्यांची धर्मांतराची भूमिका पाहिली तर १९३५ पर्यंत हिंदू धर्मातील मानवनिर्मित अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, जातीभेद संपविण्यासाठी त्यांनी ‘परिवर्तनाची लढाई’ लढली. परंतु त्यात त्यांना अपयश आल्यामुळे त्यांनी येवला येथे धर्म परिवर्तनाचे रणशिंग फुंकले. परंतु धर्म परिवर्तनाच्या भूमिकेमुळे देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला धक्का लागणार नाही ना, याचीही त्यांनी खबरदारी घेतली.
इथल्याच मातीतल्या विश्वशांती आणि बंधुत्वाची शिकवण देणारा बुद्ध धम्म स्वीकारून, भारताला त्यांनी सम्राट अशोकांची दृष्टी प्रदान केली आहे.
चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे जरी त्यांना इथे दुर्लक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला असला, तरीही सुडाची किंवा बदलाची भावना त्यांनी मनाला शिवू दिली नाही.
आचार्य अत्रेंशी बोलताना एकावेळी ते म्हणतात – “जर मला हिंदू धर्माचा सूड घ्यायचा असता तर मी या देशाचे पाच वर्षात वाटोळे करू शकतो. परंतु देशाच्या इतिहासात मला विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदवायचे नाही.!”
भारतीय स्त्रियांना ‘चूल आणि मूल’ यातून मुक्त करण्यासाठी हिंदू कोड बिल तयार करणारे डॉ. बाबासाहेब किती मोठ्या मनाचे आहेत, त्यांचे अंत:करण किती विशाल आहे, याची सहज जाणीव होते.

शेतकऱ्यांचे कैवारी –
बाबासाहेब आंबेडकरांचे कृषी विषयक विचार देशाला आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांवरील उपाय त्यांनी ‘स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देयर रेमेडीज’ या ग्रंथातून व्यक्त केले आहेत. बाबासाहेबांची मुख्य कल्पना अशी होती की, स्वतंत्र भारतात ग्राम जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी शासन जे जे प्रयत्न करेल, त्याचा पाया ‘सामाजिक न्याय’ हाच असला पाहिजे. म्हणून ‘औद्योगिकीकरण आणि शेती’ यांचे अतूट नाते असले पाहिजे. शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या लाभासाठी निर्माण करणे आवश्यक आहे. विकास कार्यक्रमातून मिळणाऱ्या लाभांची न्याय तत्त्वावर समान वाटणी आणि जे आजवर वंचित म्हणून जगत आले त्यांना अग्रहक्क देण्याची गरज त्यांनी वारंवार प्रतिपादन केलेली आहे. बाबासाहेबांचा भर नेहमी स्वावलंबनावर होता. बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारला परखडपणे बजावले की, भारतावरील कर्जाचा बोजा काही अंशी तरी शिरावर घ्यावा.
आपल्या विश्लेषणात बाबासाहेब म्हणतात, १९५८ च्या कायद्यापासून लाभ होईल, तो इंग्लंडच्या खिशात आणि कर्जाचा डोंगर भारताच्या डोक्यावर. बाबासाहेबांचे हे विश्लेषण त्यांच्या राष्ट्रीय बाण्याचे प्रतीक होते.
१९४४ मध्ये बंगाल सरकारने स्थापन केलेल्या दामोदर नदी पूर चौकशी कमिटीसमोर बाबासाहेबांनी भारत सरकारचे मजूर प्रतिनिधी म्हणून केलेले भाषण शेतकऱ्यांना हितकारक ठरते. दामोदर नदीच्या पुरामुळे हजारो लोकांचे प्राण जात होते. लाखो रुपयांचे नुकसान होत होते. दामोदर नदीला पूर येऊ नये, त्या पाण्याचा उपयोग शेती, विद्युत आणि वाहतुकीसाठी कसा करता यावा? म्हणून दामोदर नदी प्रकल्पाला मान्यता देण्याची शिफारस बाबासाहेबांनी केली. म्हणूनच पुढे बाबासाहेब म्हणाले – जलमार्ग आणि रेलमार्ग यात काहीच फरक नाही. या सत्याची आपण पुरेपूर दखल घेतली नाही आणि जर का रेलमार्ग हा राज्यानुसार विभागला जाऊ शकत नाही, तर जलमार्ग सुद्धा कोणत्याही हालतीत राज्यांमध्ये विभागला जाऊ शकत नाही. याच्याउलट आपण आपल्या घटनेला जलमार्ग आणि रेलमार्ग यात फरक करण्याचा हक्क दिला आहे. ज्यामुळे रेलमार्ग तर केंद्रीय समजले जातात पण जलमार्ग हे राज्याचे समजले जातात आणि या चुकीचे खूप सारे वाईट परिणाम दिसून येतात. म्हणून त्यांनी जलमार्गाला विशेष प्राधान्य दिले.
१८७४ च्या वतन ॲक्टमध्ये कोणतीही वतनी मालमिळकत असल्यास ती व वंशपरंपरेचा हुद्दा व त्यासंबंधीचे हक्क व अधिकार हे मिळून वतन होते, अशी वतन या शब्दाची व्याख्या करण्यात आली. अशा पद्धतीने बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचे सुद्धा हित जोपासलेले दिसते. बाबासाहेबांच्या या पुण्याईच्या अनुषंगाने कवी यशवंत मनोहर आजच्या परिस्थितीवर म्हणतात – “आमची लक्तरलेली आयुष्य शिवलीस, तो सुई दोरा कुठे ठेवलास?,
गांजलेल्या जन्मांना नरकातून ओढून पोटाशी घेतले,
ती माऊलीची माया तू कुणाजवळ ठेवलीस..?सगळ्या मापदंडांनी चरणरज व्हावे,
असा तुझा बुलंद आवाज तू कुठे ठेवलास..?
अरे मी ज्याची भक्ती करावी, शक्ती करावी, ते तुझे इमान तू कुठे ठेवलेस..?
आणि मला समजून घेऊ शकेल, ते तुझे सागराएवढे शहाणपण तू कुठे ठेवलेस..?”
मित्रहो,
आजघडीला कवी यशवंत मनोहर यांच्या वरील ओळी आपल्याला अंतर्मुख करतात त्या बाबासाहेब समजून घेण्यासाठी.
म्हणूनच बाबासाहेब केवळ वंचितांचे आणि शोषितांचेच नव्हे, तर बाबासाहेब हे मानवतेचे प्रतीक आहेत हे जाणून घेणे गरजेचे वाटते.
आज संपूर्ण भारत देश विकासाच्या दिशेने झेपावताना दिसतो, त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अखंड सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा आहे.
अशा मानवतेच्या महान पुजारीस माझे कोटी कोटी वंदन..!
जय भिम..!
जय भारत..!!
✍️ प्रा.रुपेश पाटील ✍️
🙏🙏🙏🙏


