मुंबई : आयपीएलमध्ये खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्स संघ पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. या हंगामातही असेच काहीसे दिसून येत आहे. पहिल्या 5 सामन्यात फक्त 1 विजय मिळवणाऱ्या मुंबईने आता विजयांची हॅट्रिक केली. आयपीएल 2025 चा 28 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने सहज विजय मिळवला आणि सीएसकेविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला.
एमआयने आता विजयांची हॅट्रिक करून प्लेऑफच्या आशा बळकट केल्या आहेत. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे मुंबईच्या विजयाचे हिरो होते, दोघांनीही दमदार अर्धशतकी खेळी केली.
रोहित-सूर्यकुमार यादवची विजयी खेळी –
रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने मुंबईला 177 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात करुन दिली. रायन आणि रोहित या दोघांनी पावरप्लेमध्ये फटकेबाजी केली आणि चेन्नईला बॅकफुटवर ढकललं. रायन आणि रोहितने या मोसमात पहिल्यांदा मुंबईसाठी अर्धशतकी सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर रवींद्र जडेजा याने ही जोडी फोडली. जडेजाने रायनला डेब्यूटंट आयुष म्हात्रे याच्या हाती कॅच आऊट केलं. रायनने 19 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 24 रन्स केल्या.
मुंबईने 63 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानी आला. सूर्याने तिसऱ्या स्थानी रोहितला अप्रतिम साथ दिली. या दोघांनी निर्भिडपणे विस्फोटक फलंदाजी केली. रोहितने या दरम्यान या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं. तर दुसऱ्या बाजूला सूर्यकुमारने यानेही अर्धशतक झळकावलं. अशाप्रकारे या मुंबईकर आणि लोकल बॉय असलेल्या जोडीने पलटणला सहज, एकतर्फी आणि 26 बॉलआधी विजय मिळवून दिला.
रोहित-सूर्याची शतकी भागीदारी –
रोहित आणि सूर्याने दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची नाबाद भागीदारी केली. रोहितने 45 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 76 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 30 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 8 धावांची नाबाद खेळी केली. तर चेन्नई सुपर किंग्सकडून रवींद्र जडेजा याने एकमेव विकेट घेतली.


