मुंबई : मुंबईत सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून संध्याकाळपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना संध्याकाळी चार वाजता कार्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली. या संबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे एरव्ही रात्रीपर्यंत सुरू असलेले मंत्रालयातील कामकाज सोमवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंतच आटोपल्याचं चित्र दिसून आलं.
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सेवा कोलमडलेली आहे. याचा परिणाम मंत्रालयातील कामकाजावर झालेला पाहायला मिळाला. अनेक अधिकारी, कर्मचारी कामावरती पोहोचू शकले नाही आणि जे पोहोचले त्यांना लवकर घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयातील रिकाम्या खुर्च्या टेबल पाहायला मिळत आहे.
काय म्हटलंय आदेशात?
भारतीय हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी मुंबई आणि उपनगरासाठी रेड अलर्ट घोषित केला आहे. पावसामुळे लोकल रेल्वे वाहतूक बाधित झाली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता मंत्रालय आणि बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱी यांना सोमवारी 26 मे रोजी, दुपारी 4 वाजता कार्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
मात्र असे आदेश देताना काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन तसेच अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबाबत निर्णय संबंधित विभाग प्रमुख घेतील. तसेच इतर कार्यालयांच्या बाबतील तातडीचे किंवा कालमर्यादित काम असल्यास असे काम पार पडण्यासाठी जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बाबतील संबंधित विभाग प्रमुख निर्णय घेतील.
मुंबई लोकलच्या काही फेऱ्या रद्द –
मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी सकाळी कुर्ला, सायन आणि मस्जिस स्टेशनवर पाणी साचलं होतं. नंतर या पाण्याचा पूर्णपणे निचरा झाला. मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक 30-35 मिनिटं उशिराने तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10-15 मिनिटं उशिराने सुरू आहे. दरम्यान काही लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
भुयारी मेट्रो स्थानक जलमय –
तब्बल 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने मुंबईकरांसह आणि प्रशासनाची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. पहिल्या पावसात मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचे दिसून आले. यात आता यामध्ये भूमिगत मेट्रोचीही भर पडली आहे.


