मुंबई : सूरज चव्हाण, एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदामुळे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या या यशानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपूक’ या सिनेमाची घोषणा केली, ज्यामध्ये सूरज मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला, पण दुर्दैवाने हा सिनेमा प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तरीही, सूरज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, यावेळी त्याच्या व्हायरल साखरपुड्याच्या व्हिडिओमुळे!
सूरजने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. या रिलमध्ये तो आलिशान गाडीतून, स्टायलिश सुट-बुटात एका मुलीच्या घरी जाताना दिसतो. तिथे त्याचं थाटात स्वागत होतं. व्हिडिओमध्ये सूरजची बहीणही दिसते. पुढे, एक मुलगी पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि तिला पाहताच सूरज लाजेने लालबुंद होतो. सूरजची बहीण त्या मुलीला ओवाळते आणि सूरज त्या मुलीच्या बोटात सोन्याची अंगठी घालतो. ती मुलगीही सूरजला अंगठी घालते. हा साखरपुड्याचा सोहळा पाहून सूरजच्या चाहत्यांना त्याचा साखरपुडा झाल्याचं वाटलं.
काय आहे व्हिडीओमागचे सत्य?
पण, थांबा! हा साखरपुडा खरंच झालेला नाही! सूरज झोपेत स्वप्न पाहत होता. व्हिडिओच्या शेवटी सूरजची बहीण त्याला झोपेतून उठवते आणि म्हणते, “उठ लवकर आता! किती वेळ झोपतोयस, त्या घराचं काम बघ. काय त्या उशीचा मुका घेत बसलायस.” यावर सूरज मजेशीरपणे म्हणतो, “झोपूदे की, कसलं भारी स्वप्न पडलेलं!”
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया –
हा व्हिडिओ शेअर करताना सूरजने कॅप्शन लिहिलं, “अखेर आनंदाचा दिवस उजाडला…” या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिलं, “Congratulations करणारच होतो तेवढ्यात धोका झाला!” दुसऱ्याने म्हटलं, “गुलिगत धोका!” तर काहींनी लिहिलं, “सूरज भाऊ, व्हिडिओ पाहून खरंच खूप भारी वाटलं, डोळ्यात पाणी आलं, खूप खुश झालो!” आणि “सूरज, अभिनंदन टाइप केलेलं रे, पण शेवटी गुलिगत धोका दिलास!” या कमेंट्समुळे सूरजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


