अहमदाबाद : अहमदाबाद येथील विमान अपघातामुळे देशभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत हे विमान जमिनीवर आदळले. इमारतीवर आदळल्यानंतर या विमानाचा मोठा स्फोट झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता याच अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
विजय रुपाणी हेदेखील करत होते प्रवास –
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. यातील बऱ्याच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच विमानात विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. त्यांचा विमानातील एक फोटोदेखील समोर आला आहे. विमानात बसलेल्या एका प्रवाशाने हा फोटो काढला होता. मात्र हे विमान क्रॅश झाल्यानंतर या दुर्घटनेत विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. खासदार परिमल नाथवानी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये विजय रुपाणी यांचं दुखद निधन झाल्याची माहिती देत दु:ख व्यक्त केलं आहे.
एकूण 20 पेक्षा अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू –
एअर इंडियाचे B-787 हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या विमानाने आपल्या नियोजित वेळेनुसार उड्डाण घेतले होते. मात्र लगेच या विमानात काही तांत्रिक बिघाड झाली. त्यानंतर पायलटने एक इमर्जन्सी संदेश पाठवून मदत करण्याचे आवाहन केले. मात्र त्याच्या पुढच्याच काही मिनिटांत हे विमान थेट एका इमारतीवर येऊन आदळले. विमान ज्या इमारतीवर आदळले ती वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतीगृह होते. अपघातग्रस्त विमानाचा मागचा भाग थेट या इमारतीत घुसला तर पुढचा भाग जळून खाक झाला आहे. वसतीगृहाच्या इमारतीतच भोजनालय होते. दुपारी विद्यार्थी या इथे भोजनासाठी जातात. त्याच वेळी हे विमान थेट या विसतीगृहाच्या इमारतीत घुसले आहे. यामुळे एकूण 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


