अहमदाबाद : अहमदाबादमधील मेघानीनगर भागात एअर इंडियाचं फ्लाइट एआय 171 कोसळलं. या विमान दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. एअर इंडियाचं विमान अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक एअरपोर्टला निघालं होतं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यामध्ये महाराष्ट्रातील मैथिली पाटीलनं देखील जीव गमावला. मैथिलीनं खूप संघर्ष करत एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर तिला एअर इंडियात नोकरी लागली होती.
पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या मैथिलीनं जीव गमावला –
अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली पाटीलचा समावेश आहे. क्रू मेंबर्समध्ये हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा समावेश आहे. मैथालीच्या पश्चात आई – वडील , बहिण आणि भाऊ असा परिवार आहे. मैथिलीनं हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले होते. दोन वर्षांपूर्वी तिने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात नोकरी सुरु केली होती. आजच्या घटनेनं पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.


