अहमदाबाद : अहमदाबादमधील विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये विमानात असणारे प्रवाशी, क्रू मेंबर आणि अहमदाबाद येथील हॉस्टेलमधील लोकांचा समावेश आहे. ज्या भागात हे विमान क्रॅश झाला त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील दृश्य मन हेलावून टाकणारे आहे. एका आईची माया त्यात दिसत आहे. मुलाला वाचवण्यासाठी आगीसोबत लढा देत ती सैरावैरा धावताना ती माता दिसत आहे.
शेवटपर्यंत मुलास वाचवण्याचा प्रयत्न –
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, विमान अहमदाबादमधील मेघानी नगर भागात कोसळले. त्यावेळी त्या ठिकाणी सीता पटनी नावाची महिला होती. त्या महिलेसोबत तिचा १५ वर्षांचा मुलगा होता. विमान कोसळताच आगीचा आगडोंब तयार झाला. या आगीत त्या मातेचा १५ वर्षांचा मुलगाही अडकला. त्या मुलास वाचवण्यासाठी त्या मातेचा प्रयत्न दिसत आहेत. या घटनेत त्या मुलाचा मृत्यू झाला. सीता पटनी शेवटपर्यंत त्या मुलास वाचवण्याचा प्रयत्न करत होती. या प्रयत्नात ती जखमी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये मुलास वाचवण्यासाठी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता इकडे तिकडे धावणारी माता दिसत आहे. त्या मातेच्या शेजारी विमान कोसळल्यामुळे आगडोंब निर्माण झालेले व्हिडिओमध्ये दिसत आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे. गुरुवारी १२ जून रोजी दुपारी एअर इंडियाची फ्लाइट AI-171 अहमदाबादवरुन लंडनला जात होती. अपघातानंतर हे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर भागात कोसळले. त्यात २६५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. भारतीय विमानांचा इतिहासात हा सर्वात दु:खद प्रसंग होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदाबादमध्ये पोहचले. त्यांनी अपघात स्थळाला भेट घेऊन पाहणी केली. तसेच सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी रुग्णांची चौकशी केली. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या परिवाराची ते भेट घेणार आहेत.


