दुबई : दुबईत एका गगनचुंबी इमारतीला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीतून आगीचे लोट निघताना दिसत होते. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे नाव टायगर टॉवर असे आहे. शुक्रवारी रात्री ही आग लागली होती.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार दुबईतील टायगर टॉवर नावाच्या रहिवाशी इमारतीला शुक्रवारी (13 जून) भीषण आग लागल्याची घटना घढली. ही आग एवढी भीषण होती, ज्यामुळे सगळीकडे हाहा:कार उडाला. या आगीमुळे आकाशात उंचच उच धुराचे लोट दिसत होते. विशेष म्हणजे गेल्या कित्येक तासांपासून ही आग विझविण्याचे प्रयत्न चालू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शुक्रवारी रात्री 9.30 वाजता ही आग लागली.
3800 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले –
मिळालेल्या माहितीनुसार या आगीनंतर तत्काळ अग्नीशमन दल दाखल झाले. त्यानंतर युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच या इमारतीत राहणाऱ्या जवळपास 3800 लोकांना सुरक्षितपणे अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. आग लागलेल्या या इमारतीचे नाव टायगर टॉवर असे असून या इमारतीच्या वरच्या काही मजल्यांवर ही आग लागली.
67 मजल्यांची इमारत, जीवितहानी नाही –
ही आगीची घटना घडल्यानंतर दुबईतील स्थानिक नागरी सुरक्षा पथक रात्रीच्या 2.30 वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. अजूनतही या आगीत जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही. आग लागलेली ही इमारत एकूण 67 मजल्यांची होती.
शासकीय मीडियाने नेमकं काय सांगितलं?
दुबईतील शासकीय वृत्तसंस्था दुबई मीडिया हाऊसने या दुर्घटनेबाबत माहिती दिली आहे. “या आगीत अडकलेल्या एकूण 3820 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या इमारतीत एकूण 764 अपार्टमेंट्स होते. एकूण 67 मजल्यांची ही इमारत होती. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही,” असे दुबई मीडिया हाऊसने म्हटले आहे.


