शैक्षणिक क्षेत्रातील मानबिंदू विकासभाई सावंत वाढदिवस अभीष्टचिंतन !
शब्दांकन – प्रा. रूपेश पाटील.
”शेतीत पिकणारी सगळीच कणसे दाणेदार नसतात,
जन्माला येतात खूप सारी माणसे पण..
सारीचं ‘विकासभाई’ आपल्यासारखी बाणेदार असतात!”
होय..!, तब्बल गेली तीन दशके सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण, समाजकारण, राजकारण, सहकार अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर कार्यरत असलेले अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे विकासभाई सावंत.! सावंतवाडी तालुक्याचे भाग्यविधाते असलेल्या या कुशल नेतृत्व, अभ्यासू व्यक्तिमत्वाचा आज २० जून हा जन्मदिवस. त्यांच्या वाढदिनानिमित्त त्यांच्या आश्वासक वाटचालीवर टाकलेला एक दृष्टीक्षेप !
महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटविणारे कोकणातील पहिले नेते म्हणून ज्यांची ख्याति आहे ते म्हणजे माजी आरोग्य मंत्री के. भाईसाहेब सावंत.! आजही भाईसाहेब यांचे नाव आदराने घेतले जाते. अशा सुसंस्कृत राजकीय नेत्याचे सुपूत्र असलेले विकासभाई यांची जडणघडण संस्कारसंपन्न घराण्यात झाली. आपले पिताश्री कै. भाईसाहेब हे कॉंग्रेसचे एक वजनदार नेते. राज्याचे कॅबिनेट मंत्री असल्याने घरी कशाचीही कमतरता नव्हती. मात्र भाई कधीही स्वतः तसेच कुटुंबाला मोठेपणाचा आव आणू दिला नाही. भाईसाहेब हे राजकारणी व मंत्री असले तरी ते एक हाडाचे शिक्षक होते. त्यामुळे घरात संस्कारांची जपणूक होत असे. ह्याच अत्यंत संसकारमय वातावरणात विकासभाईंचेही राजकीय व सामाजिक नेतृत्व उदयास आले. या संस्कार मूल्यांची काटेकोरपणे जपणूक करीत नात कु. नाव्व्या व नातू कु. कबीर या नातवंडासोबत त्यांचे जीवन बहरले आहे. जीवनातील अनेक संकटे, प्रसंगांना लीलया पेलत त्यांना अत्यंत धैर्याने सामोरे जाताना कधीही त्यांनी धीर सोडला नाही. प्राप्त परिस्थितीचा धैयनि सामना केला.

ज्ञानदानाचा वसा विकासभाईना वडील भाईसाहेब यांच्याकडूनचं मिळाला. म्हणूनच विकासभाईंनी शहरापासून दुर्गम खेड्यातील घराघरात शिक्षणाचा ‘ज्ञानदीप’ लावण्याचे काम शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुरू ठेवले आहे.. त्यांनी सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग इंग्लिशस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव व चौकूळ अशी ज्ञानमंदिरे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहेत.


चौकुळसारख्या दुर्गम गावात विकासभाईमुळे ज्ञानाचा दीप उजळून निघाला. विकासभाई १९८९ सालापासून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद भूषवित आहेत. बालवयातील शैक्षणिक संस्कारांचे महत्व जाणून विकासभाईंनी २००२ साली शांतीनिकेतन प्री प्रायमरी स्कूल सुरू केले. या स्कूलमध्ये आज ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशालेची ही गुणात्मक व दर्जात्मक वाटचाल केवळ विकासभाईंच्या नेतृत्वामुळेच शक्य झाली आहे. तळवडे येथे अलिकडेच सुरु केलेल्या ज्युनिअर व सिनिअर केजी वर्गानाही विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर दोडामार्ग येथे इंग्लिश मीडियम स्कूलची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली आहे.


या संस्थेने डॉ. बी. एस. नाईक सिनिअर कॉलेजची २००७ मध्ये मुहूर्तमेढ रोवली गेली. संस्थेच्या विविध शैक्षणिक संकुलांमधून आज सुमारे ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर तब्बल १०० शिक्षक व २६ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शैक्षणिक संस्थेची उच्च निकालाची परंपरा कायम आहे. या मागे संस्थाध्यक्ष विकासभाई सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन महत्वाचे ठरत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उपाध्यक्ष म्हणून गेली २५ वर्षे विकासभाई सातत्याने विजय होत आहे. त्यांनी सिंधुदुर्ग बँकेचे संचालकपद देखील भूषविले आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गजांमध्ये विकासभाईचे नाव घेतले जाते. माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, माजी वनमंत्री कै. पतंगराव कदम यांच्यासह राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांशी विकासभाईचा यांचा ‘घरोबा’ आहे.


विकासभाईनी राजकारणात १९८९ मध्ये प्रवेश केला तरूण उमदा चेहरा म्हणून काँग्रेसने त्यांना सावंतवाडी विधानसभेची १९९९ च्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. सुरुवातीपासूनच ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. आजही त्यांचा कामाचा उत्साह दांडगा आहे. आपल्या कामाच्या प्रसिद्धीपेक्षा त्याचा लाभ सर्वसामान्याला व्हावा, यासाठी ते आग्रही असतात. म्हणूनच वाढदिनी जास्तीत जास्त समाजऋण फेडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भाईसाहेब सावंत यांच्या तिसऱ्या पिढीने सुद्धा समाजसेवेचा वारसा घेतला आहे. कै. भाईसाहेब सावंत यांचे नातू व विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत हे शिवसेनेच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख या पदावर झंझावाती काम केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रशासनाची यंत्रणा उतरण्यापूर्वीच त्यांनी कोरोनावर मात करणाऱ्या यंत्रणा उभ्या केल्या याबद्दल विक्रांत सावंत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कर्तृत्वान सुपुत्र लाभलेल्या अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त हृदयपूर्वक लाख लाख शुभेच्छा ! उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना!


