एजबॅस्टन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयाची संधी आहे. फक्त आता गोलंदाजांना चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे. खरं तर पाटा विकेटमुळे गोलंदाजांचा आधीच घाम निघाला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना झटपट विकेट काढणं कठीण जाणार आहे. भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 407 धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात 180 धावांची आघाडी होती. या धावांचा पाठलाग करताना भारताने 6 गडी गमवून 427 धावा केल्या. यानंतर शुबमन गिलने डाव घोषित केला. तसेच इंग्लंसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे. गोलंदाजांची जादू चालली तर भारत सहज हा सामना जिंकू शकते. अजूनही शेवटचा दिवसाचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे आता गोलंदाजीसोबत भारतीय खेळाडूंनी चांगलं क्षेत्ररक्षण करणं भाग आहे.
दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर करुण नायर 26 धावा करून तंबूत परतला. केएल राहुलने 84 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल 162 चेंडूत 13 चौकार आणि 8 षटकार मारत 161 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 99.38 चा होता. ऋषभ पंतने 58 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकार मारत 65 धावा केल्या. पण नितीश कुमार रेड्डी पहिल्या डावासारखात दुसऱ्या डावातही स्वस्तात बाद झाला.


