बर्मिंगहॅम : भारतानं लीडस कसोटीतील पराभवाचा बदला एजबेस्टन कसोटीत विजय मिळवून घेतला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील युवा संघानं दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला आहे. लीडस कसोटीत झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करुन भारतानं एजबेस्टन कसोटीत विजय मिळवला आहे. भारतानं या विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाला आतापर्यंत एजबेस्टनमध्ये एकही विजय मिळवता आला नव्हता. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं ही कामगिरी करुन दाखवली आहे. भारताच्या विजयाची प्रमुख कारणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
फलंदाजीत सुधारणा –
भारताच्या मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डरला पहिल्या कसोटीत दमदार फलंदाजी करण्यात अपयश आलं होतं. दुसऱ्या कसोटीत यामध्ये सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. भारतानं एजबेस्टन कसोटीत पहिल्या डावात 5 बाद 211 वरुन 587 धावांपर्यंत मजल मारली. यावरुन लोअर मिडल ऑर्डरनं चांगली कामगिरी केल्याचं दिसून येतं.
शुभमन गिलची दमदार फलंदाजी –
शुभमन गिलनं दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात द्विशतक झळकावलं. शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात शुभमन गिलनं 161 धावा केल्या. शुभमन गिलला इतर फलंदाजांनी साथ दिली. यशस्वी जयस्वालनं पहिल्या डावात 87 धावा केल्या. रवींद्र जडेजानं दोन्ही डावात अर्धशतकं केली आहेत. तर, रिषभ पंत आणि केएल राहुल या दोघांनी दुसऱ्या डावात अर्धशतकं केली. भारतानं दोन्ही डावात मिळून एक हजार धावांपेक्षा अधिक धावा केल्या.
सिराज-आकाश दीपची अफलातून कामगिरी –
कसोटी मॅचमध्ये विजय मिळवायचा असल्यास गोलंदाजांना 20 विकेट घ्याव्या लागतात. इंग्लंडच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजनं 6 विकेट तर आकाश दीपनं 4 विकेट घेतल्या. तर, दुसऱ्या डावात आकाश दीपनं 6 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि रवींद्र जडेजानं विकेट घेत साथ दिली.
दरम्यान, भारतानं एजबेस्टनच्या मैदानावर यापूर्वी 8 मॅच खेळल्या होत्या. त्यामध्ये भारताला 7 पराभव स्वीकारावे लागले होते. तर, एक मॅच अनिर्णीत झाली होती. एजबेस्टनच्या मैदानावर भारताला पहिला विजय शुभमन गिलच्या नेतृत्त्वात मिळाला आहे.भारताला एजबेस्टनवर नवव्या मॅचमध्ये पहिला विजय मिळाला आहे. भारताला 1968 पासून एजबेस्टनवर विजय मिळवता आला नव्हता. अखेर शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली आहे. एजबेस्टनवर विजय मिळवणारा आशियातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये भारत पहिला देश ठरला आहे.भारतानं या विजयासह मालिकेत बरोबरी केली. दोन्ही डावातील मिळून 430 धावा करणाऱ्या शुभमन गिलला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.


