मुंबई : राज्यात यंदा मान्सून वेळआधी दाखल झाला. मे महिन्यात मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर जून महिन्यात काही दिवस पावसाने ओढ घेतली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात सर्वत्र पावसाने जोर धरला आहे. आता आगामी पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणात पाच दिवस मुसळधार –
कोकण, मध्य महाराष्ट्रात १३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात ९ जुलैनंतर पावसाचा जोर असणार आहे. त्यानंतर पाऊस कमी होणार आहे. यंदा राज्यात मराठवाडा आणि विदर्भ वगळता सर्वत्र पावसाने सरासरी गाठली आहे. कोकणात ७ जुलैपर्यंत १०३ टक्के पाऊस झाला आहे. नाशिकमध्ये १०२ तर पुण्यात १०१ टक्के पाऊस झाला आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरात पावसाची तूट आहे. नागपूरमध्ये सरासरीच्या ८४ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला आहे.
देशातील या भागांत जोरदार पाऊस –
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पूर्व भारतात मुसळधार पाऊस होणार आहे. त्याचा परिणाम हा आपल्या राज्यात पाहायला मिळणार आहे. सध्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्रीसगडमध्ये अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या नवसारीमधील पुर्णा नदीला पूर आला आहे.


