लंडन : विम्बल्डन 2025 च्या अंतिम लढतीत जागतिक क्रमांक 1 असलेल्या इटलीच्या यानिक सिनरने दुसऱ्या क्रमांकावरील कार्लोस अल्काराजचा पराभव करत इतिहास रचला. विम्बल्डन 2025 च्या थरारक अंतिम सामन्यात सिनरने अल्काराजला 4-6, 6-4, 6-4, 6-4 अशा सेट्सनी पराभूत केलं आणि गत महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला.
पहिला सेट गमावूनही बनला चॅम्पियन!
सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये अल्काराजने आक्रमक खेळ करत 4-6 असा विजय मिळवला. मात्र त्यानंतर सिनरने अप्रतिम पुनरागमन केलं. उर्वरित तीनही सेट्समध्ये त्याने अल्काराजची एकही सर्व्हिस ब्रेक करू दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये एकमेव सर्व्हिस ब्रेक करत सिनरने 6-4 असा सेट जिंकत सामन्यात पुनरागमन केलं आणि पुढचे दोन्ही सेट्सही त्याच निकालासह जिंकत विजेतेपदावर नाव कोरलं.
यानंतर तिसऱ्या सेटमध्येही यानिक सिनरने एकदा कार्लोस अल्काराजची सर्व्हिस ब्रेक केली आणि सामन्यात 2-1 अशी आघाडी मिळवली. पण चौथ्या सेटमध्येही अल्काराज आपली सर्व्हिस वाचवू शकला नाही. सिनरने पुन्हा एकदा 6-4 असा सेट जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
अल्काराजच्या हॅट्ट्रिकचं स्वप्न भंगले, सिनरचा ऐतिहासिक पराक्रम!
विम्बल्डन 2025 मध्ये यानिक सिनरच्या विजयानं कार्लोस अल्काराजचं सलग तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं. 2023 आणि 2024 मध्ये नोवाक जोकोविचला पराभूत करून अल्काराजने दोन वर्षं सलग विम्बल्डन जिंकलं होतं. यंदा मात्र सिनरने त्याला ‘हॅट्ट्रिक चॅम्पियन’ होण्यापासून रोखलं. विशेष म्हणजे, सिनर विम्बल्डन एकेरी विजेतेपद पटकावणारा पहिला इटालियन खेळाडू बनला आहे.
त्याआधीही सिनरने आपल्या खेळाचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 व 2025, तसेच यूएस ओपन 2024 अशी तीन ग्रँड स्लॅम ट्रॉफी त्याने आधीच आपल्या नावावर केली होती.
ग्रँड स्लॅम फायनल्समध्ये दमदार कामगिरी
2024 ते 2025 या कालावधीत यानिक सिनरने एकूण 5 ग्रँड स्लॅम फायनल्स खेळल्या आणि त्यापैकी चारमध्ये बाजी मारली. जर त्याने याच वर्षीचा फ्रेंच ओपनही जिंकला असता, तर तो सलग चार ग्रँड स्लॅम जिंकणारा दुर्मीळ खेळाडू ठरला असता. पण तिथेच अल्काराजने त्याला पराभूत करत सिनरचं कॅलेंडर स्लॅमचं स्वप्न अपूर्ण ठेवलं.


