सावंतवाडी : आपल्या भारत देशाला विकसित करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी आत्मनिर्भर बनणे देखील तेवढेच गरजेचे आहे. कोणताही उद्योग हा कमी नसतो. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे छोट्या छोट्या उद्योगातूनच गगनभरारी घेता येते. म्हणून प्रत्येकाने छोट्या उद्योगांचे प्रशिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी, असे मत आजगाव सरपंच यशस्वी सौदागर यांनी व्यक्त केले. आरोस – दांडेली येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित, माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय आरोस – दांडेली येथे भारत सरकार मान्यता प्राप्त बँक ऑफ इंडिया पुरस्कृत आरसेटी सिंधुदुर्ग व माऊली महिला मंडळ, शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जुलै २०२५ पासून नर्सरी व्यवस्थापन व कलम बांधणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माऊली महिला मंडळ अध्यक्षा श्रीम. रेखाताई गायकवाड, समाजसेविका अलकाताई नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाच्या संचालिका श्रीम. कुडतरकर ताई, आजगाव सरपंच सौ. यशश्री सौदागर, श्रीम. गाडगीळ मॅडम तसेच मंडळाच्या सदस्या श्रीम. कदम मॅडम त्याचबरोबर बँक ऑफ इंडियाचे श्री. कासले आदि उपस्थित होते.


व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी स्वावलंबी आयुष्य कसे जगावे व छोट्या उद्योग उद्योगातून मोठे यश कसे मिळवावे याबद्दल मार्गदर्शन केले व उपस्थितांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. रेखाताई गायकवाड वयाची ८० वर्षे झालेली असताना सुद्धा दिव्यांग व सर्वसाधारण मुलांसाठी असे प्रशिक्षण राबवित त्यांना स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातून त्यांची विद्यार्थी व त्यांच्या आयुष्यासाठी असलेली तळमळ दिसून येते असे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. सदरील प्रशिक्षण हे १८ ते ४५ वयोगटासाठी आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. काळे यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक एस. एस. उकरंडे यांनी मानले.


