मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा महायुती सरकार आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्र्यांचा एकमेकांची जिरवण्यामध्ये मोठा टाईम जातो आहे, संजय शिरसाट नेहमी म्हणतात की माझ्या मंत्रिपदामध्ये पैसे नाहीत, आणि दुसरीकडे त्यांच्या घरात पैशाच्या बॅगेसकट त्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात, असा टोला रोहित पवार यांनी यावेळी शिरसाट यांना लगावला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभेचा जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजप घाबरलं होतं, अजितदादांचा गट घाबरला होता, शिंदेंचा गट घाबरला होता. भाजपाने या दोन्ही पक्षांचा वापर केला आणि सत्ता आल्यानंतर शिंदेंच्या पक्षाला, अजित दादांच्या पक्षाला वापरून आता भाजप त्यांना फेकून देत आहे, असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
महायुतीच्या मंत्र्यांमध्ये अंतर्गत कलह आहे, भाजप हे शिंदेंच्या मंत्र्यांचा आणि अजित दादांच्या मंत्र्यांचा कामापुरता वापर करत आहे, सर्व मंत्र्यांचे कारणामे बघितले तर सर्व मंत्र्यांना असं वाटतंय की आपल्याला मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो, त्यामुळे ते घर भरून घेत आहेत. सर्वच मंत्री भ्रष्टाचार करत आहेत, गरीब आत्महत्या करतात तर हे एकमेकांची जिरवण्यात आणि कुरकुघोडीत करण्यात व्यस्त आहेत. यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत, यावर देखील रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कराड प्रकरणाचा विषय आणखी काही पुढे आलेला नाही, त्याच्यामध्ये आपल्याला इन्वेस्टीगेशन करावे लागेल, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांची मैत्री अनेक वर्षांपासून आहे. वाल्मीक कराडचा विषय आणखी संपलेला नाही. संतोष देशमुख यांना देखील न्याय मिळाला नाही, महादेव मुंडेंचे प्रकरण आता पुढे येत आहे. अजितदादा फक्त एका प्रकरणावरती बोलले असतील, मात्र ज्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्यावर अजित पवार बोलले नाहीत, अजित पवार यांनी घाई गडबडीमध्ये हे स्टेटमेंट केलेलं आहे असं मला वाटतं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


