विकासभाई सावंत – एक अजातशत्रू समाजकारणी !-

सुमारे पस्तीस वर्षापूर्वीचे राजकारण आणि आताचे राजकारण याची तुलनाच होऊ शकत नाही. राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी एकमेकांना संपवण्याची भाषा अगदी सभागृहात होते. आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत हे भान आता कुणालाचं राहिले नाही. वैचारिक लढाईची जागा आता मारामारी, निंदानालस्ती आणि सुडाच्या राजकारणाने घेतली आहे. अशावेळी सर्वसमावेशक राजकारण करणारी जी काही मंडळी होती त्यामध्ये जेष्ठ काँग्रेस नेते स्व. विकासभाई सावंत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
आजचे राजकारण अशा एका विचित्र वळणावर आहे की राजकारणात जर आपले आणि आपल्या कुटुंबिया़चे दुरगामी आर्थिक हित साधायचे असेल तर चांगुलपणा हा खुंटिला टांगून ठेवावा लागतो, पण विकासभाई हे या जिल्ह्यातील असे नेते होते की त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही पक्षनिष्ठेला तिलांजली दिली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा. शरदचंद्र पवारसाहेबानी जेव्हा मा. सोनिया गांधी यांच्या बरोबर परदेशी मुद्यावरून मतभेद झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा विकासभाईना त्यानी विधानपरिषदेची आॅफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. ते म्हणाले, माझ्या वडिलांना संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसने ओळख दिली. कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना माजगाव सारख्या एका गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील शिक्षकाला थेट महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांच्या पश्चात त्यांचा सुपूञ म्हणून काँग्रेसच्या अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यतच्या नेत्यांनी सन्मान दिला. जिल्हा परिषद, राज्य सहकारी बॅक, जिल्हा बॅंक अशा विविध संस्थावर काम करण्याची संधी पक्षाने ती त्या पक्षाशी कधीही गद्दारी करणार नाही ही विकासभाईंची निष्ठा.!

राजकारणात चारित्र्य, अभ्यासू, शांत व संयमी लोकांचे आता कामच राहिले नाही त्यामुळे गेल्या वीस वर्षाहून जास्त काळ विकासभाईना क्षमता असूनही मनासारखे राजकारण करण्याची संधी मिळाली नाही.

तरीही आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता विकासभाई शेवटपर्यंत पक्षाच्या अनेक कार्यक्रमात सहभागी असायचे. सहकार, शिक्षण अशा विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास, अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत. भाई त्या सर्वांना मनात कोणत्याही प्रकारचा पक्षीय अभिनिवेश न ठेवता मोकळा मनाने मदत करत असत.
नियतीसुद्धा किती कठोर होती, अनपेक्षित एकावर एक कौटुंबिक आघात, असे आघात की ते झेलणे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे. हे सर्व आघात भाईनी अगदी धीरोदात्तपणे पचवले. आपल्या या अतीव दु:खाचे सहानुभूती मिळवण्यासाठी कधीच जाहीर प्रदर्शन केले नाही. स्वत:चे दु:ख गिळून दुसऱ्यानां मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे. मी अनेकदा त्यांच्याबरोबर तासनतास चर्चा केलेली आहे. पण कधीही कुणाबद्दल आकसाने बोललेले मला आठवत नाही. सतत हसरा चेहरा आणि शांतपणे एखाद्या विषयावरची मांडणी हे त्यांचे स्वभाव वैशिष्टे होते.
सध्याचे त्यांना न झेपणारे आणि न पचणारे राजकारण आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेली चार पाच वर्षे राजकीय व्यासपीठावर म्हणावे तेवढे सक्रिय नव्हते. मात्र राणी पार्वती देवी हायस्कूल, ज्युनियर व सिनियर काॅलेजच्या शैक्षणिक विकासाचा ध्यास घेऊन ते अहोरात्र झटत होते. आज त्या शैक्षणिक संकुलाचा जो लक्षवेधी विकास दिसत आहे त्यामध्ये विकासभाईंचे समर्पण मोठे आहे. शाळेसाठी मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ते रात्रौ बारा बारा वाजेपर्यंत झटत असतं. एखाद्या शैक्षणिक संस्थेचे यश हे विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थाचालक यांच्या समन्वयावर अवलंबून असते, आणि हा चौकौन भाईनी व्यवस्थित साधलेला होता.
शाळा हा विकासभाईंचा श्वास होता तसाच त्यांचा अवघ्या आठ वर्षाचा नातू कबीर हा त्यांचा दुसरा श्वास. आजोबा व नातवाची खरोखर विलक्षण केमेस्ट्री होती. दोघेही एकामेकाशिवाय राहूच शकत नव्हते. मी अनेकदा जायचो. एकदा माझ्या समक्षच तो कोवळा पोर आपल्या आजोबांच्या शरिराचे तापमान आणि शुगर चेक करत होता. हे द्रुष्य माझ्यासाठी मन हेलावणारे होते. आता त्याचे आजोबा त्याच्या सोबत नाहीत अशावेळी त्या कोवळ्या मनाची काय तगमग होत असेल ? याची कल्पनाच करवत नाही.
मुलगा विक्रांत याने राजकारणात यावे की नको? याबाबत त्यांनी त्याला पूर्ण मुभा दिलेली होती. माझ्या बरोबर चर्चा करताना ते म्हणाले, की नकुलजी, अशा प्रकारची चर्चा सुरू होणार की आमचे घराणे हे वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ अशावेळी विंक्रात याने उध्वव ठाकरेंच्या सेनेत जाण्याचा घेतलेला निर्णय तसा मलाही आवडलेला नाही, पण आता तो वयाने आणि विचाराने परिपक्व आहे, त्यामुळे त्याचा बाप म्हणून शुभेच्छा देणे एवढेच मी करू शकतो.
विकासभाई़च्या या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांची कधीही भरून न येणारी हानी झालेलीच आहे. काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते एका निष्ठावंत, अभ्यासू मार्गदर्शकाला मुकला. सहकार, शिक्षण क्षेत्राचीही अपरिमित हानी झाली. माञ मी वैयक्तिकरित्या एका सच्चा मिञाला कायमचा मुकलो. शाळेच्या माध्यमातून विकासभाईनी अतिशय कष्टाने जे वैभव निर्माण केलेले आहे ते जपण्याचे, वृध्दींगत करण्याचे आणि भाईंचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आता विक्रांतची आहे आणि ती तो निश्चितच सांभाळेल. त्यासाठी श्री देव पाटेश्वराने त्याला मानसिक बळ देवो, विकासभाईचे मिञ म्हणून आम्ही सदैव विक्रांतच्या पाठीशी आहोत.
एक अजातशत्रू समाजकारणी, अभ्यासू आणि शांत, संयमी मिञ विकासभाईना भावपूर्ण आदरांजली!
– ॲड. नकुल पार्सेकर.


