मुंबई : नवी मुंबईत घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडले आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने अल्पवयीन मुलासोबत अश्लील व्हिडीओ चॅटिंग केल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणी पीडित मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी संबंधित शिक्षिकेविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय शिक्षिकेची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका अल्पवयीन मुलासोबत ओळख झाली. ही ओळख कालांतराने मैत्रीत बदलली. २७ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास या दोघांनी व्हिडीओ चॅटिंग केले. या चॅटिंगदरम्यान शिक्षिकेने अर्धनग्न अवस्थेतील स्वतःचे चित्रीकरण मुलाला पाठवले. मुलाने हे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते.
यानंतर एकदा मुलाची आई त्याचा मोबाईल तपासत असताना हे आक्षेपार्ह चित्रीकरण तिच्या निदर्शनास पडले. यानंतर तिने तात्काळ मुलाला याबद्दल विचारले असता, त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन, मुलाच्या आईने जराही वेळ न घालवता कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठले. यानंतर तिने संबंधित शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. त्या मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने शहानिशा केली. प्राथमिक तपासानंतर, पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
समाजात तीव्र संताप –
शिक्षिकेने केलेल्या या कृत्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिक्षकांना समाजात आदरणीय स्थान दिले जाते. ते विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत त्यांच्याकडूनच असे गैरकृत्य घडल्याने पालक वर्गात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत असून, लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.


