सावंतवाडी : दि शा फाऊंडेशन व कलंबिस्त इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेत *पहिली ते चौथी* गटात सांगेली घोलेवाडीची श्रावणी सचिन राणे, *पाचवी ते सातवी* गटात शिरशींगे नं.1 ची आकांक्षा बाबाजी धोंड तर आठवी ते दहावी गटात सांगेली हायस्कूलची मयुरी बाळकृष्ण नाईक प्रथम आली.

उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे- 1 ली ते 4 थी गट द्वितीय क्रमांक- अन्वी पांडुरंग राऊळ(शिरशींगे नं१), तृतीय क्रमांक- वेद विठ्ठल बिड्ये (वेर्ले नं.३), उत्तेजनार्थ- अर्णवी अनिल सनाम( सांगेली सनामटेंब)

5 वी ते 7 वी गट- द्वितीय क्रमांक-सार्था विठ्ठल बिड्ये (वेर्ले नं.१), तृतीय क्रमांक- अन्वी अजित देसाई (शिरशींगे नं१), उत्तेजनार्थ- गतिक धाकू जंगले( सांगेली हायस्कूल)
*8 वी ते 10 वी* गट- द्वितीय क्रमांक-अक्षरा अनिल राऊळ(शिरशींगे हायस्कूल), तृतीय क्रमांक- माधुरी महेश राऊळ(कलंबिस्त हायस्कूल), उत्तेजनार्थ-शमिका संतोष धर्णे(सांगेली हायस्कूल)

बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता कलंबिस्त प्रशालेत वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य श्री भरत गावडे व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अभिजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक श्री महेश पेडणेकर व अन्य शिक्षक उपस्थित होते
तीनही गटात मिळून या स्पर्धेत 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. भरत गावडे, श्री. महेश पेडणेकर, श्री. किशोर वालावलकर यांनी काम पाहिले..
बक्षिस वितरण समारंभावेळी *दिशा फाऊंडेशनच्या* स्थापनेच्या उद्देशाबाबत बोलताना दिशा फाऊंडेशनचे सचिव श्री. दिपक राऊळ म्हणाले, की 1993-94 च्या कलंबिस्त प्रशालेतील दहावीच्या बॅचने समाजातील दुर्बल,गरजू व अनाथ घटकांसाठी सेवाभावी काम करण्याच्या हेतूने 2023 मध्ये दिशा फाऊंडेशनची स्थापना केली व स्थापनेपासून या संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांना मदत कार्य करण्याचे काम सुरू केलेले आहे. परमेश्वराने आपल्याला पृथ्वीतलावर एका उद्देश्य पूर्तीसाठी माणूस म्हणून जन्माला घातलेले आहे. भगवंताने मानव म्हणून जन्म देताना आपल्याला दोन हात दिले. माञ दान देण्याची दृष्टी आपल्यालाच कमवावी लागेल. त्यामुळे आपल्याकडे जे काही आहे त्याच्यापैकी काही अंश तरी समाजातील गरजू लोकांना देता येईल का ? यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. सृष्टीचा नियम आहे की, इथून आपल्याला काहीच नेता येणार नाही. म्हणून गरजूंना आपल्या मदतीचा हात देऊन मानवता धर्म जपूया ..! असे उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना आवाहन करण्यात आले. आपल्यावर परमेश्वराने दिलेल्या जबाबदारीला ओझे न समजता कर्तव्यनिष्ठतेने पूर्णत्वास नेणे, गरजेचे आहे. आपले कर्तव्य आपण devotedly पूर्ण केले तर मोक्षा पर्यंत जाण्यासाठी अजून दुसरे काही करण्याची गरज नाही. त्यामुळे आपले चांगले काम किंवा आपली विनम्रता आपल्याला योग्य मार्गाकडे नक्कीच घेऊन जाईल, असे सर्वांना यावेळी सांगितले.
तसेच कलंबिस्त पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व वाकचातुर्याला चालना देण्यासाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. *उत्तम वकृत्व हे एक* *उत्कृष्ट नेतृत्व असते* . त्यामुळे आपल्या वक्तृत्वाचा उपयोग समाजाच्या हिताच्या दृष्टीने कसा करता येईल ,याचा विचार सर्वांनी केला पाहिजे,असा एक नवा दृष्टिकोन यावेळी संस्थेचे सचिव श्री. दिपक राऊळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना देऊन सर्वांचे अभिनंदन केले.
कलंबिस्त प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. किशोर वालावलकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. व दिशा फाऊंडेशनच्या सहसचिव सौ.विनिता कविटकर यांनी सर्वांचे आभार मानले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमात उपस्थित दिशा फाऊंडेशनचे सचिव श्री.दिपक राऊळ व दिशा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्री.अनिल राऊळ, श्री. प्रवीण कुडतरकर, सहसचिव सौ. विनिता कविटकर, सौ.कल्पना सावंत, श्री. राजू गोवेकर आदी उपस्थित होते. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, श्री भरत गावडे ,सांगेली केंद्रातील प्राथमिक शाळेचे मार्गदर्शक शिक्षक, कलंबिस्त, सांगेली, शिरशिंगे हायस्कूलचे मार्गदर्शक शिक्षक व पालक यावेळेस उपस्थित होते. दिशा फाऊंडेशनचे पदाधिकारी व श्री भरत गावडे, शाळेचे प्राचार्य श्री अभिजीत जाधव व उपस्थित मान्यवरांकडून सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.


