नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे, तसेच ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील भेटणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या भेटीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये या भेटीदरम्यान २५ मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली आहे. या भेटीदरम्यान वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लवकरच शाहांसोबत महायुतीमधील घटक पक्षांची देखील बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारदरम्यान या भेटीवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. सर्व खासदारांसोबत मी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, खासादारांचे देखील काही विषय होते, तेही मी या भेटीदरम्यान मांडले. मागच्या आठवड्यात देखील मी आलो होतो, त्यावेळी मी त्यांना भेटलो नव्हतो, म्हणून आज सदिच्छा भेटही झाली आणि खासदारांसदर्भातील काही विषय होते, ते ही मांडले. मी तर जाहीरपणे भेटतो, खासदारांसोबत भेटतो, जे काही विकासात्मक प्रकल्प आहेत, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांच्या वतीनं सुरू आहेत, त्यावर देखील यावेळी चर्चा झाली. दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे, मी लपून छपून काही काम करत नाही. मी जे करतो ते सगळ्यांच्या समोर करतो, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता थोड्याचवेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महायुतीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी भावना एकनाथ शिंदे यांची आहे. यासोबतच अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.


