वैचारिक चिंतन –
शाळेमध्ये विद्यार्थी असताना लोकशाही म्हणजे राज्यकारभार करण्याची एक पद्धती एवढेच माहित होते. नंतर मात्र लोकशाही ही केवळ राज्य करण्याची पद्धती नसून जीवन जगण्याची पद्धती आहे, असा अर्थ महाविद्यालयात आल्यावर समजला.
लोकशाहीचा अर्थ , जीवन जगायला लागल्यावर खऱ्या अर्थाने आता समजू लागला आहे. लोकशाही म्हणजे असे व्यक्तिस्वातंत्र्य की, प्रत्येकाला आपल्याला देशात काहीही करता येते. कोणा बद्दल काहीही बोलता येते , कोणाविषयी काहीही लिहिता येते मग ती व्यक्ती किती कां ज्येष्ठ वा श्रेष्ठ असेना ! कसेही वागता येते.
अगदी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमदार किंवा खासदार यांना तर पूर्णच स्वातंत्र्य. सभागृहात गोंधळ घालण्याचे स्वातंत्र्य, सभागृहाबाहेर एकमेकांना मारण्याचे स्वातंत्र्य , सभागृहात एखादे विधेयक एकमताने पास करून बाहेर येवून त्याच विधेयकाबद्दल आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य , वाट्टेल त्या मार्गाने निवडणुका जिंकण्याचे स्वातंत्र्य , निवडून आल्यावर वाटेल त्या मार्गाने संपत्ति मिळविण्याचे स्वातंत्र्य , मोठे मोठे गुन्हे करून जामीन मिळवून शासनात व प्रशासनात उच्च पदावर काम करण्याचे स्वातंत्र्य , आपल्या गुंड कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचे स्वातंत्र्य हे सर्व लोकशाही व्यवस्थेचे योगदान होय .
बरे , हे स्वातंत्र्य केवळ लोकप्रतिनिधीच उपभोगतात असे नव्हे तर तुम्हा आम्हालाही ही सोय उपलब्ध आहे. त्यामुळे आपणही कोणाबद्दलही काहीही बोलू शकतो , शासनाने केलेले कायदे झुंड करून मोडू शकतो . नेमून दिलेल्या अभ्यासक्रमावर पेपर काढलेला असला तरी पेपर अवघड होता म्हणून आंदोलन करू शकतो. शासनाच्या रिकाम्या जागेवर अतिक्रमण करून टोलेजंग इमारती बांधू शकतो . आणि अशी बांधकामे अवैध ठरविली तर शासनावर दबाव आणून त्यांना नियमित करून घेवू शकतो . शासनातील कोणत्याही अधिकाऱ्याला पैसे देवून वाट्टेल ते काम करून घेऊ शकतो.
शासनाच्या किंवा एखाद्या संस्थेच्या नियम व अटी मान्य करून नोकरी पत्करून दोन वर्षानंतर याच अटी जाचक आहेत किंवा अन्याय कारक आहेत म्हणून संप करू शकतो . शासनाच्या किंवा अनुदानित शाळा उत्तम आहेत व इंग्रजी माध्यमाच्या शाळा अव्वाच्या सव्वा फी आकारतात हे माहीत असूनही आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशित करवून नंतर भरमसाठ फी शाळा घेते म्हणून आंदोलन करू शकतो . हे सर्व आपल्याला लोकशाहीने दिलेली देणगी आहे .
आमची पिढी स्वातंत्र्य म्हणजे काय हे नीटसे न समजायच्या काळात वाढली . त्यामुळे आमच्या पिढीला हे स्वातंत्र्य फारसे उपभोगता आले नाही . आम्ही लहान असताना थोरा मोठयांचे ऐकायचे व त्यांच्या आज्ञेबाहेर जायचे नाही ही शिकवण तर आम्ही ज्या वेळी तरुण झालो ( १९७५ दरम्यानचा काळ ) नेमके त्यावेळी स्त्री स्वातंत्र्याची चळवळ जोमात सुरु झाली त्यामुळे आमचा उमेदीचा काळ बायकांचे ऐकण्यात गेला व नेमके उतारवयात आता लहान मुलांचे ऐकायचे ही कल्पना पुढे आल्यामुळे टीव्हीवर बातम्या किंवा सिरीयल पाहण्याऐवजी गूपचूप नातवंडाकडे रिमोट देऊन त्यांची कार्टूनस पहायची . म्हणजेच आमच्या पिढीला स्वातंत्र्य कळालेही नाही व मिळालेही नाही.
आताची पिढी खूपच भाग्यवान आहे. पूर्वीसारखा आता घरात कर्ता पुरुष राहिलेला नाही . कारण घरात आता प्रत्येक जण काहीही कर्तबगारी न करता देखील कर्त्या व्यक्तिचे अधिकार उपभोगत आहे. त्यामुळे घराचे म्हणून काही नियम असतात व ते सर्वांनी पाळायचे असतात ही कल्पनाच कालबाहय झालेली आहे. घरामध्ये लहानमुले देखील आईवडिलांना अरेतुरे बोलतात , तरुण आपल्या वाडवडिलांसमोर धूम्रपान किंवा अपेयपान करण्याचे स्वातंत्र्य उपभोगत आहेत . मुले मुली आपल्या गर्ल फ्रेंड किंवा बॉयफ्रेंड सोबत Dating च्या नियोजना बाबत आसपासच्या थोरामोठ्यांचा विचार न करता चर्चा करण्याचे स्वातंत्र्य उपभोगत आहेत . तर काही धूमधडाक्यात लग्न करून वर्ष सहा महिन्यात सहजपणे घटस्फोट घेत आहेत .
आपल्या घराण्याचे, परंपरांचे, समाजाचे, कायद्याचे कोणतेही बंधन न पाळता मुक्तपणे जगण्याचे स्वातंत्र्य म्हणजे लोकशाही पद्धतीने जीवन जगणे होय . किंबहुना हीच खरी लोकशाही ही संकल्पना रूढ झालेली आहे. आपल्या भारतीयांच्या अंगात खऱ्या अर्थाने लोकशाही मुरली आहे . जगात कोठेही इतकी लोकशाही रुजलेली नाही.
आणि अशा प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगणारा, आपला देश खऱ्या अर्थाने लोकशाही प्रधान महान देश होय.
– डॉ. ह. ना. जगताप.


