नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यात धमाका केला. शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या 5 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्वासह फलंदाजीनेही आपली छाप सोडली. शुबमनने फक्त धावाच केल्या नाहीत असंख्य विक्रम मोडीत काढले. शुबमनने अशाप्रकारे कर्णधार म्हणून पदार्पणातील मालिकेत अप्रतिम आणि ऐतिहासिक कामगिरी केली. तसेच टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनीही भरीव योगदान दिलं. त्यामुळे टीम इंडियाची युवा ब्रिगेड मालिका 2-2 ने बरोबरीत राखण्यात यशस्वी ठरली. इंग्लंड दौऱ्यानंतर आता भारतीय संघ महिनाभर रिलॅक्स मोडवर आहे. मात्र भारताचा कर्णधार शुबमन गिल काही दिवसातच पुन्हा एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. शुबमन आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. शुबमन या स्पर्धेत नॉर्थ झोनच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र शुबमनला फार वेळ या स्पर्धेत खेळता येणार नाही. त्यामुळे शुबमनच्या जागी प्रसिद्धीपासून दूर असलेल्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. शुबम रोहिल्ला असं या फलंदाजाचं नाव आहे.
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर आता थेट सप्टेंबर महिन्यात आशिया कप स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना हा 10 सप्टेंबरला होणार आहे. मात्र या दरम्यान देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या देशांतर्गत हंगामाला दुलीप ट्रॉफी स्पर्धेने सुरुवात होणार आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 5 झोनमधील संघ सहभागी होतील. या संघात काही भारतीय कसोटी खेळाडूंचा समावेश असेल. मात्र दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या संघात देशांतर्गत क्रिकेटमधील बहुतांश खेळाडूंचा समावेश असणार आहे. शुबमन या स्पर्धेत नॉर्थ झोनचं नेतृत्व करणार आहे. मात्र शुबमनची 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणाऱ्या आशिया कप 2025 स्पर्धेसाठी निवड केली जाऊ शकते. त्यामुळे शुबमनला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सर्व सामन्यांसाठी उपलब्ध राहता येणार नाही.
शुभम रोहिल्लाबाबत थोडक्यात –
शुबमनला आशिया कप स्पर्धेसाठी संधी मिळाल्यास त्याच्या जागी दुलीप ट्रॉफीत शुबमचा समावेश केला जाऊ शकतो. शुभम देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्व्हिसेजसाठी खेळतो. शुभमने 2015 साली त्याच्या राज्याकडून रणजी ट्रॉफीत पदार्पण केलं होतं. मात्र शुभम सध्या सर्व्हिसेजसाठी खेळतो.
शुभमची फर्स्ट क्लास कारकीर्द –
शुभमने 51 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 29 च्या सरासरीने 2 हजार 459 धावा केल्या आहेत. ओपनर म्हणून खेळणाऱ्या शुभमने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5 शतकं आणि 13 अर्धशतकं झळकावली आहेत.


