कणकवली : येथील कणकवली महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे २०२५ या वर्षाच्या उपक्रमाचे उद्घाटन व विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्र प्रशिक्षण संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील ग्रामीण विकास विभागाचे विभाग प्रमुख व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉ.राजेंद्र मुंबरकर हेही उपस्थित होते.
प्र.प्राचार्य युवराज महालिंगे यांनी विद्यार्थ्यांना यानिमित्त शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी या विभागात चांगले काम करून समाजातील जे विविध प्रश्न आहेत त्यावर संशोधन करावे हे सुचविले. या विभागात कार्य करतांना विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकास व रोजगाराचे धडे मिळतील असेही सांगितले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाय सुचवावे असे ही आवाहन यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती या विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनीही विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास करून घ्यावा. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा संपूर्ण इतिहास यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितला. या विभागांतर्गत क्षेत्रभेटी घेत असताना विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट काम करावे” असे यावेळी डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी सांगितले. या विभागांतर्गत काम करत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगीकृत असलेल्या गुणांना वाव देण्यास मदत मिळेल असेही यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमांमध्ये बुशरा बागवान व स्नेहा अजगेकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या विभागाचे सदस्य प्रा. साहिल माणगावकर हेही या ठिकाणी उपस्थित होते.
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुरेश हुसे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन प्रा. दीपा तेंडुलकर व शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक मंदार पडेलकर यांनी केले.यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी संदेश कसालकर व महेश बाणे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


