मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारची आर्थिक कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा ऑगस्ट महिन्याचा पगार हा लवकर म्हणजे 5 दिवस आधीच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला होतो. मात्र यावेळी गेल्या महिन्याचा पगार १ सप्टेंबरऐवजी २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. गेल्या महिन्याचा पगार यावेळी पाच दिवस आधीच देण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.
दरम्यान, राज्य सरकारचा हा निर्णय जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांना / कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही लागू राहणार आहे. त्यामुळे, या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या खात्यात 5 दिवस आधीच आपला पगार जमा होताना दिसणार आहे.


