सावंतवाडी : मळगांव येथील एका गृह निर्माण प्रकल्पाच्या घरांचे घरपत्रक उतारे देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मळगांव ग्रामपंचायत प्रभारी पंचायत विकास ( ग्राम विकास )अधिकारी ज्ञानदेव सीतराम चव्हाण ( ५२, रा. कणकवली, मूळ रा. आकेरी, ता. कुडाळ ) याला आज शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
शहरातील एका हॉटेलमध्ये सायंकाळी ६ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मळगाव येथील एका गृहनिर्माण प्रकल्पातील घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या प्रकल्पाचे विकासक विजय नाईक यांनी मळगाव ग्रामपंचायतकडे सदर घरांच्या घर पत्रक उताऱ्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र गेले आठ ते नऊ महिने हे घरपत्रक उतारे देण्यास संबंधित अधिकाऱ्याकडून टाळाटाळ केली जात होती.
यानंतर संबंधित विकासकामे सदर ग्रामसेवकाची प्रत्यक्ष भेट घेतल्यावर त्याने हे दाखले देण्याकरिता विकासाकाकडे आर्थिक मागणी केली होती. सुरुवातीला त्याने १ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, ही रक्कम त्यांना संबंधिताला द्यायची नव्हती.
त्यानंतर सदर विकासकाने सिंधुदुर्ग जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधत याची कल्पना दिली. त्यानुसार सदर एक लाखाची रक्कम कमी करत अखेर ४० हजार रक्कम देण्याचे ठरले. ही ठरलेली रक्कम देण्यासाठी सदर विकासकामे आज संबंधित ग्रामसेवकाला फोन केल्यानंतर आपण सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले.
त्या माहितीनंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत सदरची रक्कम स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी चव्हाण याला रंगेहात ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणून सदर विकासकाला बोलावून घेत त्याने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी विजय पांचाळ, पोलिस निरीक्षक दीपक माळी, हवालदार श्री. रेवणकर, अजित खंडे, प्रितम कदम, गोविंद तेली, विजय देसाई, पोलिस शिपाई स्वाती राऊळ, पो. कॉ. भूषण नाईक, योगेश मुंढे आदींनी केली.


