नांदेड : सद्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्सव महाराष्ट्रभर सुरु असताना नांदेड जिल्ह्यातून एक संतापजनक आणि काळीज पिळवटून निघणारी घटना समोर आली आहे. नांदेडच्या गोळेगावात एका प्रेमीयुगुलाची केवळ प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून संपूर्ण गावासमोर धिंड काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. ऑनर किलिंगच्या या घटनेने केवळ नांदेडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. संजिवनी कमळे (वय १९) आणि लखन भंडारे (वय १७ रा. बोरजूनी) असं मृत प्रेमीयुगुलाचं नाव आहे. संजिवनी हिचं लग्न नजीकच्या गोळेगावातील एका तरुणाशी वर्षभरापूर्वी झालं होतं. मात्र लग्नाआधी तिचा संपर्क बोरजुनी गावातील लखन भंडारे याच्याशी होता, जो विवाहानंतरही सुरूच राहिला होता. दोघांमध्ये लपूनछपून भेटीगाठी, संभाषण सुरु होते. काही दिवसांपूर्वी संजिवनीच्या सासरचे लोक बाहेर गेले असताना, तिने लखनला घरी बोलावलं. मात्र, अचानक पती आणि सासरच्या लोकांनी घरी येऊन दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं. यानंतर वातावरण चिघळलं. संजिवनीच्या पतीने आणि सासरच्यांनी तिच्या माहेरच्या लोकांना आईवडील, काका आणि आजोबांना बोलावून घेतलं. त्यानंतर गावात कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन, त्या दोघांची गावभर धिंड काढण्यात आली. संपूर्ण गावासमोर ही धिंड निघाली. या दोघांना एखाद्या गुराप्रमाणे दोरीने हाताला बांधला होतं. दोघांना दोरीने बांधून गावात धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, लखनचे हात एका दोरीने बांधले आहे. त्याला गावातून फिरवलं जात आहे. तर त्याच्यापाठोपाठ एक वृद्ध व्यक्तीने संजीवनीचे हात दोरीने बांधले होते, तिलाही गावातून फिरवलं जात होतं. कोणीही मध्ये पडून त्यांना अडवण्याचा किंवा वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही.
ही धिंड केवळ मानसिक छळ नव्हता, तर जणू मृत्यूची पूर्वसूचना होती. धिंडीनंतर लाठी-काठ्यांनी आणि हातातील धारदार शस्त्रांनी संजिवनी आणि लखनला अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर बेदम प्रहार करण्यात आले, अखेरीस त्यांनी जाग्यावरच प्राण सोडले. इतक्यावरच थांबता न, दोन्ही मृतदेह जवळच्या ४० फूट खोल विहिरीत टाकून दिले गेले.
या घटनेनंतर कुणीही पोलिसांना कळवलं नाही, संपूर्ण गाव मुकदर्शक बनून राहिला होता. ही घटना ‘पुरोगामी महाराष्ट्रा’च्या शरमेची बाब ठरली आहे.
लखन भंडारे याच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला. “ज्यांनी माझ्या मुलाची निघृण हत्या केली, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला न्याय मिळावा,” अशी मागणी त्यांनी केली. सध्या पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.


