दुर्ग : पोलिसांना रोजच्या आयुष्यात अनेक विचित्र गोष्टींचा सामना करावा लागतो. कधी कधी व्यक्ती का चोर, गुन्हेगार होतो याची तितकीच विचित्र कारणं पुढं येतात. तुम्ही गोष्टीचा कसा अर्थ काढता, त्यावर जीवनाचा मार्ग ठरतो. पोलिसांनी 45 वर्षांच्या एका चोराला अटक केली. गेल्या 10 वर्षांपासून तो केवळ मंदिरातच चोरी करत असल्याचे तपासात समोर आले. पण पुढे त्याने जे सांगितले त्याने पोलिसांना खरा धक्का बसला.
ही घटना छत्तीसगडमधील दुर्ग येथील आहे. पोलिसांनी 45 वर्षाच्या या माणसाला अटक केली. त्याने एका मंदिरात चोरी केली होती. सीसीटीव्ही आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवली. तापासात तो एचआयव्ही बाधीत असल्याचे समोर आले. गेल्या दहा वर्षांपासून तो केवळ मंदिरातच चोरी करून त्याचे आयुष्य जगत असल्याची माहिती त्याने दिली. ज्या देवाने मला हा शाप दिला, त्याला धडा शिकवण्यासाठी आपण केवळ मंदिरातच चोरी करत असल्याची माहिती त्याने दिली. 10 वर्षांपूर्वी 2012 मध्ये एका मारहाण प्रकरणात तो तुरुंगात गेला. त्यावेळी तो एचआयव्ही बाधीत ठरला. त्याचा देवावरचा विश्वास उडाला. देवाने मला हा आजार दिला आहे तर मग मी पण त्याला त्याची जागा दाखवणार, या एकाच भावात त्याने गेल्या 10 वर्षांत अनेक मंदिरात चोरी केली. तो म्हणाला की मी कुणाच्याच घरी, दुकानात कुठेच चोरी केली नाही. मी केवळ देवाच्या मंदिरातच चोरी केली.
राज्यात मंदिरात ज्या मोठ्या चोऱ्या झाल्या, त्यात या व्यक्तीचा हात असल्याचा पोलिसांचा कयास आहे. त्याने केवळ 10 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पण दहा वर्षांत केवळ दहा चोऱ्या केल्यावर पोलिसांचा विश्वास नाही. या 23-24 ऑगस्ट रोजी दुर्ग शहरातील एका जैन मंदिरात शिरून त्याने तिथली दानपेटी फोडली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्याआधारे पोलिसांनी या व्यक्तीचा माग काढला.
या व्यक्तीनुसार, तो अगोदर मंदिराची रेकी करत होता. त्यानंतर मंदिरापासून बऱ्यात अंतरावर त्यांची दुचाकी उभी करत असे. त्यानंतर कपडे बदलत असे. चेहरा झाकून दानपेटीतील रक्कम चोरत असे. त्याच्या मते त्याने कधीच कोणत्याच देवळातील देवांचे दागदागिने चोरले नाही. कारण ती विक्री करण्याचे आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची त्याला भीती होती. तो चोरी करण्यापूर्वी आणि चोरीनंतर देवाला नमस्कार करत असल्याचे सीसीटीव्हीत समोर आले. ही व्यक्तीला एड्सचे शिकार झाल्याने मानसिक धक्का बसल्याचे समोर आले आहे. चोरीवर त्याचा उदरनिर्वाह सुरू होता. ज्या परिसरात तो राहत होता. तिथे त्याने कुणालाच कसाल त्रास दिला नसल्याचे तपासात समोर आले आहे.


