मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. त्यांच्या पाठिंब्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आरक्षणासंदर्भातील सरकारसोबतची चर्चा अद्याप निष्फळ ठरत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालय परिसरातील काही रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, सीएसएमटी आणि आझाद मैदान परिसरात आंदोलकांची गर्दी वाढल्याने वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून सामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पोलिसांकडून युद्धपातळीवर कोंडी सोडवण्याचे प्रयत्न –
सोमवारी चाकरमान्यांची मोठ्या संख्येने कामावर जाण्याची वेळ आणि आंदोलन यामुळे कोंडीत भर पडली आहे. प्रवाशांना वेळेत ऑफिसला पोहोचणे कठीण झाले आहे. वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यायी मार्ग दाखवणे, वाहनांना वळवून लावणे यांसारख्या उपाययोजना सुरू आहेत. सरकार आंदोलकांमध्ये तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत असून, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबईत कुठे कुठे वाहतूक कोंडी?
सायन–पनवेल हायवे : वाशी टोल नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
वाशी ते मानखुर्द : संपूर्ण पट्ट्यात वाहनांची लांबच लांब रांग लागल्या आहेत.
पश्चिम द्रुतगती महामार्ग : बोरीवलीहून वांद्रेच्या दिशेने वाकोला, विलेपार्ले आणि अंधेरी परिसरात प्रचंड कोंडी दिसत आहे.
सांताक्रुझ-वाकोला उड्डाणपूल : खड्ड्यात मोठा पॅच मारल्यामुळे वाहतुकीचा वेग पूर्णपणे ठप्प झाला आहे.
मुंबईत वाहतूक कुठे आहे सुरळीत?
पूर्व ईस्टर्न मार्ग : सध्या वाहतूक सुरळीत, खासगी वाहने व आंदोलकांच्या गाड्यांनाही प्रवेश. मात्र, ऑफिसच्या वेळा (सकाळी 10 नंतर) सुरू झाल्यावर परिस्थिती बदलू शकते.
अटल सेतू : येथेही वाहतूक सुरळीत असल्याचे दिसत आहे.


