चिंतन –
परवा फार दिवसांनी एस.टी. बसमधून प्रवास करण्याचा योग आला. प्रवासात माझ्या शेजारी माझ्या समवयस्क सभ्य दिसणारे गृहस्थ बसले होते प्रवासही लांब पल्ल्याचा होता म्हणून शेजाऱ्यांशी गप्पा मारणे अपरिहार्य होते. थोडीशी एकमेकांची ओळख झाल्यावर शेजारील गृहस्थांच्या बोलण्यामध्ये एकदम उत्साह व त्वेष संचारला. त्यांनी एकदम शिक्षण व्यवस्थेवर हल्लाच चढविला. आता आमच्या गप्पा न राहता ते गृहस्थ वक्ते व मी व आसपासचे प्रवासी वक्ते बनले होतो.
त्यांनी शिक्षकांच्या व शिक्षण व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेच्या उदाहरणांची मालिकाच सादर केली. प्रथम संस्थेच्या अहवालानुसार ७ वीच्या मुलांना गुणाकार भागाकार येत नाही तिसरी चौथीच्या मुलांना लिहिता वाचता येत नाही, शाळेतील मुले सर्रास शिव्या देतात काही ठिकाणी तर शिव्या मुक्त शाळांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, परवाच नाशिकच्या मुलांनी मित्रांवर चाकू हल्ला केला, तर अहमदाबादच्या शाळकरी मुलांनी मित्राचा खून केला. एका तालुक्याच्या ठिकाणच्या शाळेतील मुलींच्या दफ्तरात कंडोमची पाकीटे सापडली तर एका ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी स्वतः बरोबर अल्कोहोल ची कुपी जवळ बाळगतात व पाण्याच्या बाटलीत टाकून पितात, काही ठिकाणी मुलानेच आपल्या बापाचा खून केला या सर्व घटना वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्यामते या सर्व घटनांना तुमचे शिक्षक व शिक्षण व्यवस्थाच जबाबदार आहे. ज्या शिक्षकांच्या वेतनावर व शिक्षण व्यवस्थेवर शासन व समाज हजारो कोटींचा खर्च करीत आहे त्या शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था तुम्ही शिक्षकांनी करून ठेवली आहे. हे गृहस्थ इतक्या सात्त्विक संतापाने बोलत होते की त्यांचा प्रतिवाद तेथे करणे मला शक्य झाले नाही. विशेष म्हणजे आमच्या आसपासच्या प्रवाशांनाही हे मुद्दे इतके पटले होते की, त्यांनी केवळ टाळया वाजवायचेच बाकी होते. हे सर्व ऐकून मी सुन्न झालो.
घरी आल्यावर मी माझ्या मित्रासोबत हा किस्सा शेअर केला तर तो म्हणाला, त्या गृहस्थाचे अगदी बरोबर आहे. खरे तर त्यांनी तुलाच तेथे जबाबदार ठरवायला हवे होते. तुम्हीच बी.एड., डी.एड., मधून हे शिक्षक तयार केले आहेत त्यामुळे या परिस्थितीला तुम्ही जास्त जबाबदार आहात. आता मात्र माझा संयम सुटत चालला होता.
मी म्हटले, विद्यार्थी शाळेत जास्तीत जास्त सहा तास असतो त्यावेळेत शिक्षक त्यांना नेमून दिलेला अभ्यासक्रम शिकवितात. याच अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या इतर गुणांचा विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम राबवितात . शिक्षक विद्यार्थ्यांना कधीही वाईट बोलावे वाईट वागावे असे सांगत नाहीत . शाळेतील वातावरण समाजातील इतर कोणत्याही कार्यालयांपेक्षा सुंदर पवित्र ठेवले जाते. असे असूनही उपरोक्त घटना घडताना दिसतात त्याला शिक्षक कसे जबाबदार?
घरात दारु पिणारे, भ्रष्टाचार करणारे पालक, आपल्या मुलांना शिक्षकांनी कोणतीही शिक्षा करू नये असे आग्रहपूर्वक सांगणारे पालक, प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या घरात आपल्या मुलांना दिले जाणारे मुक्त स्वातंत्र्य , माध्यमातून सातत्याने दाखविले जाणारे मुक्त लैंगिक संबंध व अश्लील दृष्यांचे चित्रण, दारु पिणाऱ्या सिगारेट ओढणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्ती, समाजामध्ये बदफैली करणाऱ्या तरीही समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरविल्या जाणाऱ्या व्यक्ती ,हिंसाचाराच्या घटनांचे दूरदर्शन व मोबाईल मधून केले जाणारे भडक चित्रण या गोष्टींचा मुलांवर काहीच परिणाम होत नाही कां ? दररोज दूरदर्शनवर समाजातील नेते देखील एकमेकांना शिवीगाळ करताना इतकेच नव्हे तर पंतप्रधानाच्या आईचा उध्दार करणारे नेतेही हे विद्यार्थी पाहत आहेत . त्यामुळे शिव्या देणे ही काही असाधारण गोष्ट आहे असे विद्यार्थ्यांना कां वाटावे?
असे असताना समाजातील प्रत्येक वाईट गोष्टीला शिक्षण व्यवस्था किती जबाबदार याचाही विचार व्हायला नको कां ? केवळ शिक्षकांना याबाबत जबाबदार कसे धरता येईल ? यावर माझ्या मित्राने मला विचारले , ” तू हे त्या गृहस्थांजवळ कां बोलला नाहीस? ” मी विचारात पडलो खरेच आपण कां बोललो नाही . आपण बोलायला हवे होते .आपल्या न बोलण्यानेच लोकांचीही आपल्यावर आरोप करण्याची हिंमत वाढते . ही माझीच नव्हे तर आपणा सर्व शिक्षकांची स्थिती आहे. आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावायलाच हवे पण त्याबरोबरच आपल्यावर कोणी खोटे आरोप करीत असतील तर तितक्याच समर्थपणे आपण फेटाळायलाही हवेत.
आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा !
– डॉ. ह. ना. जगताप.


