लातूर : जिल्ह्यातील चाकुर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली होती. वाढवणा-चाकूर रोडवर शेळगाव शिवाराजवळील तिरु नदीच्या कडेला झुडपात एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडा लातूर पोलिसांनी केला आहे. मृत महिलेची ओळख फरीदा खातून (वय 23, रा. उत्तर प्रदेश) अशी झाली आहे. तिचा पती जीया उल हक याने परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरुन चार साथीदारांच्या मदतीने तिचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकून नदीत फेकून दिला होता.
24 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली होती –
24 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली होती. प्रकरण गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 5 विशेष तपास पथके गठीत केली. तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे बयान, सीसीटीव्ही तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केवळ काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला. अटक आरोपींमध्ये जीया उल हक (वय 34), सज्जाद जरूल अन्सारी (19), अरबाज जमलू अन्सारी (19), साकीर इब्राहिम अन्सारी (24) आणि आजम अली उर्फ गुड्डू (19) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एआयचा वापर करत डिजिटल चित्र तयार करत लावला शोध –
तिरु नदीच्या काठी बॅगमध्ये मृतदेह आढळल्याने लातूर जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी पाच पथके तयार करत गुन्हचा छडा लावला. पाण्यामुळं विद्रूप झालेला चेहरा, गुन्ह्याचा माग काढण्यासाठी उपलब्ध नसलेली माहिती यामुळे पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. विद्रूप झालेल्या चेहऱ्याचे सर्वप्रथम स्केच तयार करण्यात आले. एआयचा वापर करत त्याचे डिजिटल चित्र तयार करण्यात आले आणि शोध सुरू झाला. यात पोलिसांना यश मिळालं. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नांदेड परिक्षेत्राचे उप-महानिरीक्षक यांनी तपास पथकाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
आठ महिन्यातील दुसरी घटना –
या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. विशेष म्हणजे, याच रस्त्यावर आठ महिन्यांपूर्वी हणमंतवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह टाकण्यात आला होता. ती मृत महिला कोण.? कुठली आहे खून कोणी केला याचा तपास अद्याप लागलेला नाही. दरम्यान पुन्हा एकदा याच भागात मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. बॅगेत महिला असल्याच्या चर्चेमुळे घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.


