नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शिवसेना संसदीय पक्षाचे नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे शिवसेनेवर भाजप नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेला आहे.
आज मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी संसदेत उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच उपराष्ट्रपतीपदाचे एनडीए उमेदवार व विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नवी दिल्ली येथे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. बैठकीदरम्यान मतदानाची प्रक्रिया खासदारांना समजावून सांगण्यात आली. उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून डॉ. शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि राम मोहन नायडू हेही काम पाहणार आहेत.


