सावंतवाडी :येथील नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या व्यथा आणि वेदना नेहमीच आमचे नेते व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी नगराध्यक्ष असताना जाणलेलल्या आहेत. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनानंतर त्यांच्याच पुढाकाराने महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवरून सदर कामगारांना न्याय मिळवून त्यांचे पगार वितरित झाले आहेत. ही खरी वस्तुस्थिती आहे मात्र असे असताना केवळ जनतेने नाकारलेले आणि 300 मतं मिळालेल्या बबन साळगावकरांची बाजू घेऊन बालिश वक्तव्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी थोडा अभ्यास करावा, असा टोला युवासेना पदाधिकारी तथा शहराध्यक्ष निखिल सावंत, युवा सेनेचे विधानसभा अध्यक्ष अर्चित पोकळे, निखिल सावंत,युवा सैनिक क्लेटस फर्नांडिस, राजू कुबल यांनी लगावला आहे.
दरम्यान युवा सैनिकांनी पुढे म्हटले आहे की, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आमचे मित्र रवी जाधव अतिशय चांगले काम करत आहेत. त्यांच्या या कार्याचा आम्ही नेहमीच आदर केला आहे. मात्र आमच्या आदराचा आणि आमच्या नेत्याचा त्यांनीही आदर करावा, अशी आमची प्रामाणिक इच्छा आणि भावना आहे. उगीच सामाजिक कार्य करत असताना कुणाचे तरी ऐकून आणि राजकीय व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास न करता राजकारणावर भाष्य करणे कृपया श्री. जाधव यांनी टाळावे.
त्यांनी आजपर्यंत केलेले कार्य नक्कीच आम्हास प्रेरणादायी वाटत, असे असताना उगीचच त्याला राजकीय वळण देऊन रवी जाधव हे भरकटत चाललेले आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजू परब नगराध्यक्ष असताना त्यांनी अल्पावधीत केलेले कार्य भल्या भल्यांना थक्क करणारे आहे. एकदा तरी रवी जाधव यांनी नगरपरिषदेत जाऊन कृपया आमच्या नेत्याच्या कार्याचा आढावा घ्यावा आणि मगच वक्तव्य करावीत.
तसेच त्यांनी केविलवाणे वक्तव्य करणे टाळावे, असेही युवासैनिकांनी म्हटले आहे.


