गयाना : कॅरिबियन प्रीमियर लीग 2025 च्या एलिमिनेटर फेरीत ट्रिनबागो नाईट रायडर्स विरुद्ध अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स सामना झाला. हा सामना ट्रिनबागो नाईट रायडर्स 9 विकेटनी जिंकला. या सामन्यात ट्रिनबागो नाईट रायडर्सचा अनुभवी अष्टपैलू सुनील नरेनने सीपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनून इतिहास रचला.
गयानाच्या प्रोव्हिडन्स क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात ट्रिनबागो नाईट रायडर्सने अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सचा 9 विकेटने पराभव केला. सुनील नरेनने त्याच्या चार षटकांमध्ये 36 धावा देत एक गडी बाद केला. इमाद वसीमला बाद करून नरेनने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. आता सीपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. सीपीएलमध्ये 130 बळींचा टप्पा गाठणारा नरेन हा पहिला खेळाडू ठरला.

सीपीएलमध्ये नरेनचे एकूण 130 विकेट आहेत. त्यापैकी 99 विकेट ट्रिनबागो नाईट रायडर्सकडून आणि 31 गयाना अमेझॉन वॉरियर्सकडून आहेत. दोन वेगवेगळ्या फ्रँचायझी-आधारित टी20 लीगमध्ये 130 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
नरेनने आयपीएलमध्ये 192 विकेट्स घेतल्या आहेत. सुनील नरेन त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत फक्त कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे.


