सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडीच्या माठेवाडा येथील प्रिया चव्हाण हिने आत्महत्या केल्याच्या आदल्या दिवशी तिला देवगडच्या नगरसेविका प्रणाली माने आणि त्यांच्या मुलाने मारहाण केली होती. तसेच 2023 मध्ये त्यांनी एका कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यालाही मारहाण केली होती. त्यामुळे अशा प्रवृत्तीला लोकप्रतिनिधी पदावर ठेवणे समाज हितासाठी घातक आहे. तसेच प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयित पदाचा गैरवापर करून साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे नगरसेविका प्रणाली माने यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मयत प्रियाचे पती पराग चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे केली आहे.
शुक्रवारी पराग चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 4 जुलै 2025 रोजी आपली पत्नी प्रिया हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार प्रणाली माने व तिचा मुलगा आर्य माने यांनी माझ्या पत्नीला तीन जुलै 2025 रोजी मारहाण व शिवीगाळ केली होती. या प्रकरणी माझ्या सासरच्या लोकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आता या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून या संशयित आरोपींवर दोषारोप पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे.
नगरसेविका प्रणाली माने, पती मिलिंद आनंदराव माने व मुलगा आर्य माने या तिघांवर याआधीही देवगड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या परिवाराने 11 ऑक्टोबर 2023 रोजी एका कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व त्याचे मित्र यांना मारहाण केली होती. अशा समाज विघातक प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींना नगरसेविका किंवा लोकप्रतिनिधी म्हणून पदावर ठेवणे समाजहिताच्या घातक आहे. तसेच माझ्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात त्या पदाचा गैरवापर करत साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. प्रणाली माने यांच्या मालमत्तेची ही चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
मी व माझ्या लहान मुलीने (वय वर्ष 5) जे गमावले आहे, ते मी शब्दात सांगू शकत नाही. मात्र भविष्यात हे दुसऱ्या कोणासोबत घडू नये, यादृष्टीने संबंधितांवर योग्य कारवाई करून मला आणि माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, असेही पराग चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


